मसूदची कोंडी करण्यासाठी फ्रान्स पाठोपाठ जर्मनीची भारताला साथ

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये चीनने खोडा घातला असला तरी युरोपमधील देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.

संग्रहित छायाचित्र

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये चीनने खोडा घातला असला तरी युरोपमधील देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. फ्रान्सने मसूद अझहरची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जर्मनीने अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला पाठिंबा दिला आहे. मसूद अझहरचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये चर्चा सुरु आहे.

आमचा फ्रान्सबरोबर समन्वय असून आम्ही सकारात्मक आहोत असे जर्मन दूतावासातील प्रवक्ते हॅन्स ख्रिस्टीयन विनक्लेर यांनी सांगितले. युरोपियन युनियनमधील सर्व सदस्यांचे एकमत झाल्यानंतर सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल असे हॅन्स यांनी सांगितले. आपल्या नकाराधिकाराचा वापर करुन चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये खोडा घातला.

अझहर विरोधातील प्रस्ताव मंजूर झाला असता तर अनेक निर्बंध घालता आले असते. सुरक्षा परिषदेतील बहुतांश सदस्य देशांचे प्रस्तावाला समर्थन असताना चीनने चौथ्यांदा मसूद विरोधातील प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही. युरोपियन युनियन आधी संयुक्त राष्ट्राच्या यादीत नसलेले दहशतवादी आणि संघटनांचा आपल्या यादीत समावेश करत नव्हती. पण मागच्या काही वर्षात नियमांमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार सर्व सदस्य सहमत असतील तर दहशतवादाशी संबंधित असलेल्याचा यादीमध्ये समावेश करता येऊ शकतो. अझहरच्या मुद्यावर अन्य देशांचा पाठिंबा मिळेल असा जर्मनीचा विश्वास आहे. अलीकडे झालेला पुलवामा तसेच यापूर्वी देखील भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Germany backs move to ban masood azhar

ताज्या बातम्या