जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांच्या उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन डेमॉक्रेटिक युनियन (CDU) पक्षाला थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. जर्मनीचा डावा पक्ष असलेल्या सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ जर्मनीला (SPD) सर्वाधिक मतं मिळाली आहेत. असं असलं तरी कुणालाही बहुमत न मिळाल्यानं जर्मनीतील निकाल त्रिशंकू लागलाय. त्यामुळे जर्मनीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांना एकत्र येऊन युती सरकार स्थापन करावं लागणार आहे. सोशल डेमॉक्रेट्सला २५.७ टक्के मतं मिळाली, तर सत्ताधारी डेमॉक्रेटिक युनियन पक्षाला २४.१ टक्के मतं मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रिशंकू निकाल, युतीच्या सरकारमध्ये २ पक्ष किंगमेकर

जर्मनीच्या केंद्रीय निवडणुकांच्या निकालानुसार आता सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा कोणत्याही एका पक्षाला न मिळाल्यानं युती करणं अनिवार्य असणार आहे. यात सर्वाधिक मतं मिळाल्यानं सेंटर लेफ्ट डेमॉक्टेट्सला सर्वप्रथम सत्ता स्थापनेची संधी मिळेल. यात जर्मनीच्या इतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील पक्षांची भूमिका ‘किंग मेकर’ची असेल. यात ग्रीन पार्टी १४.८ टक्के मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाने स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं मिळवली आहेत.

आता जर्मनीतील युती सरकारमध्ये ग्रीन पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल. याशिवाय उदारमतवादी फ्री डेमॉक्रेटिक पार्टीचीही (FDP) भूमिका महत्त्वाची असेल. एफडीपी पक्षाला ११.५ टक्के मतं मिळाली आहेत. जर्मनीची निवडणूक सुरुवातीपासूनच अंदाजाच्या पलिकडची ठरलीय. अनेक जनमत चाचण्यांचे अंदाज फोल ठरवत हा निकाल लागलाय.

जर्मनीच्या संसदेत एकूण ७३५ जागा

जर्मनीच्या संसदेत एकूण ७३५ सदस्य असतात. यापैकी या निवडणुकीत एसपीडीला २०६ जागा (२५.७ टक्के मतं), सीडीयू/सीएसयूला १९६ जागा (२४.१ टक्के मतं), ग्रीन पार्टीला ११८ (१४.८ टक्के मतं) आणि एफडीपीला ९२ जागा (११.५ टक्के मतं) मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Germany election results 2021 spd win over angela markel party cdu pbs
First published on: 27-09-2021 at 11:22 IST