नवी दिल्ली : ‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर अटक प्रकरणावर जर्मनीनेही भाष्य केले आह़े  ‘‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखायला हव़े  त्यामुळे पत्रकारांना तुरुंगात डांबू नका’’ असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने झुबेर यांच्या अटकेचा दाखला देताना गुरुवारी नमूद केल़े

 ‘‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत़  जगभरात त्यांचे महत्त्वाचे स्थान आह़े  ते अबाधित राहायला हव़े  ही बाब भारतालाही लागू आहे’’, असे नमूद करत जर्मनीने झुबेर यांच्या अटकेकडे लक्ष वेधल़े  त्यावर, जर्मनीने चुकीच्या माहितीवर आधारित विधाने टाळायला हवीत, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली़  

जामिनासाठी झुबेर सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला अल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े  या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली.

सरन्यायाधीशांच्या मंजुरीच्या अधीन हे प्रकरण शुक्रवारी सूचीबद्ध केले जाईल, असे न्या़  इंदिरा बॅनर्जी आणि न्या. जे. के. माहेश्वरी यांच्या सुटीकालीन खंडपीठाने गुरुवारी या याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केल़े  झुबेरला धमक्या येत असल्याने त्याच्या जिवाला धोका आह़े  त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी झुबेर यांच्या वकिलाने  न्यायालयाला केली़