मावळत्या चॅन्सलर मर्केल यांच्या पक्षाची पीछेहाट

बर्लिन : जर्मनीतील निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत सोशल डेमोक्रॅट्स पक्षाने सर्वाधिक मते मिळवून मावळत्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमॉकॅट्रिक युनियनचा निसटता पराभव केला.

जर्मनीतील ७३५पैकी २९९ मतदारसंघांमधील निकालांनुसार सोशल डेमोकॅट्रिक पक्षाने (एसपीडी) २५.९ टक्के, तर मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमॉकॅट्रिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियन (सीडीयू-सीएसयू) या आघाडीला २४.१ टक्के मते मिळाली आहेत.

आपल्याला सरकार स्थापण्यासाठी स्पष्ट कौल मिळाल्याचा दावा सोशल डेमोक्रॅट्सचे नेते आणि मावळते व्हाइस चॅन्सलर ओलाफ श्लोल्झ यांनी केला आहे. श्लोल्झ यांनी १५ वर्षांनंतर पक्षाला हे यश मिळवून दिले आहे. लोकांनी चांगले आणि प्रागतिक सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे, असे शोल्झ म्हणाले. ऐतिहासिक पराभव झालेल्या मर्केल यांच्या पक्षानेही आम्ही छोटय़ा पक्षांशी चर्चा करून सरकार स्थापन करू असे म्हटले आहे.

युरोपची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीचे नेतृत्व अँगेला मर्केल यांनी १५ वर्षे केले. त्यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत त्यांची अनुपस्थिती जाणवली.

मतमोजणी सुरू असून २९९ मतदारसंघांत सोशल डेमोक्रॅट्स आघाडीवर आहे. त्यांना २५.९ टक्के मते मिळाली आहेत तर मर्केल यांच्या सीडीयू-सीएसयू आघाडीला २४.१ टक्के मते मिळाली आहेत. पर्यावरणवादी ग्रीन्स पक्षाला १४. ८ टक्के मते मिळाली असून फ्री डेमोक्रॅट्सना ११.५ टक्के मिळाली आहेत. ग्रीन पक्षाचा कल नेहमीच सोशल डेमोक्रॅट्स आणि फ्री डेमोक्रॅट्सकडे राहिला आहे. पण सध्या तरी कुठल्याही शक्यता नाकारता येत नाहीत. मर्केल १६ वर्षे सत्तेवर होत्या, त्यात सोशल डेमोक्रॅट्सचा १२ वर्षे सहभाग होता, पण नंतर त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. 

यापूर्वी जर्मनीतील निवडणुकांमध्ये यश मिळवलेल्या कुठल्याही पक्षाने ३१ टक्कय़ांपेक्षा कमी मते मिळवली नव्हती.

पक्ष                  मते

एसपीडी        २५.९ टक्के

सीडीयू-सीएसयू   २४.१ टक्के