उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद परिसरात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १५० कोटींच्या संपत्तीच्या वादातून मुलाने स्वत:च्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाझियाबाद हादरलं असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पाच पथके रवाना केली आहेत.
नेमकं घटना काय घडली?
गाझियाबादमधील मोदीनगर परिसरातील एका ३२ वर्षीय तरुणाने स्वत:च्या ५५ वर्षीय वडिलांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मद्यधुंद अवस्थेत घरी परतला असल्याने वडिलांनी मुलाला जाब विचारला होता. मात्र, वडिलांनी जाब विचारल्यामुळे मुलाला राग अनावर झाला. यावरूनच त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
या वादादरम्यान मुलाने वडिलांवर तब्बल ३ गोळ्या झाडल्या आणि यामध्येच वडिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख मोदीनगर परिसरातील रहिवासी असलेले हरिओम अशी पटली आहे. हरिओम हे शेतकरी होते. आता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि निखिल व निशू हे दोन मुले असा परिवार आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीच्या पत्नीने म्हणजे आरोपीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, “त्यांचे पती आणि मोठा मुलगा निखिल यांच्यात काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास निखिल घरी आला, तेव्हा वडील म्हणजेच हरिओम हे जेवण करून झोपले होते. पण याचवेळी निखिल मद्यधुंद अवस्थेत आल्याचं पाहून त्यांनी मुलगा निखिलला विचारलं की तू मद्यपान करून का आला? यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की यामध्ये संपत्तीचा वादही उकरून निघाला आणि रागाच्या भरात माझ्याच मुलाने माझ्याच पतीवर गोळ्या झाडल्या.”
“गोळीबाराचा आवाज ऐकून मी घटनास्थळी धावत गेले आणि पाहिलं तेव्हा मुलगा निखिलच्या हातात पिस्तूल होती. तेव्हा त्याने माझ्या समोर पतींवर तीन गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या माझ्या पतीच्या डोक्यात व पोटात लागल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर मुलगा निखिल घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर आरडाओरड झाल्याने नातेवाईक व शेजारी घटनास्थळी आले आणि माझ्या पतीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेलो, पण तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या पतीला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं”, असं हरिओम यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे.
नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली?
मृत हरिओम यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं की, “हरिओम यांच्या मालकीची ७५ बिघे (४७ एकर) एकर जमीन होती. यातील काही जमीन दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेच्या जवळ आहे. तसेच मोदीनगर बाजारपेठेत तीन मोठी दुकानेही आहेत. या सर्व मालमत्तेचं एकूण मूल्य हे जवळपास १५० कोटींपेक्षा जास्त आहे. काही महिन्यांपूर्वी हरिओम यांनी या मालमत्तेचे तीन वाटे केले होते. यामध्ये एक निखिलसाठी, एक निशू या दुसऱ्या मुलासाठी आणि तिसरा वाटा स्वतःसाठी व पत्नीसाठी केला होता. मात्र, हरिओम यांनी मालमत्तेची वाटणी केली असली तरी त्या वाटणीचे कागदपत्र पूर्ण केलेली नव्हती. त्यामुळे निखिलला त्याच्या वाट्याच्या जमिनीची कागदपत्र लवकरात लवकर अंतिम करून पाहिजे होते. मात्र, त्यासाठी वडिलांनी नकार दिला होता. हरिओम यांनी सांगितलं होतं की, निखिलचं लग्न होईपर्यंत आपण जमिनीची कागदपत्र करून देणार नाहीत. त्यामुळे निखिलने मद्यपान करण्यास सुरू केली आणि यावरूनच त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता”, अशी माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितली आहे.
पोलिसांनी काय माहिती सांगितली?
डीसीपी सुरेंद्र नाथ तिवारी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, “तक्रारीच्या आधारे निखिलविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची ५ पथके रवाना करण्यात आली आहेत.” दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, निखिलकडे कथितरीत्या गावठी पिस्तूल होती. तसेच प्राथमिक तपासातून अशीही माहिती समोर आली आहे की, २०१८ मध्ये एका वादादरम्यान निखिलने आपल्या धाकट्या भावावर गोळी झाडली होती आणि त्यामध्ये धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला होता.
