गाझियाबाद – सोशल मीडियासाठी रील बनवण्याचे वेड तरुणाईच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये रविवारी पहाटे अशीच एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. एका भरधाव स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात होऊन १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मित्र सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
नेमकी घटना काय?
गाझियाबादमधील NH-9 जवळ ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्रा (१९) ही तरुणी आपली ‘यामाहा R-15’ ही स्पोर्ट्स बाईक चालवत होती, तर तिचा मित्र हसीम मागे बसला होता. हे दोघेही बाईकवरून थरारक रील बनवत असताना वेगावरील नियंत्रण सुटले आणि बाईक थेट दुभाजकाला (डिवायडर) जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बाईकचा चक्काचूर झाला.
रील बनवणे पडले महागात
अपघाताच्या काही सेकंद आधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये इक्रा अत्यंत वेगाने बाईक चालवताना दिसत आहे, तर हसीम मागे बसून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, दोघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते. सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट जीवावर बेतला.
कुटुंबियांना न सांगता घराबाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, इक्रा आणि हसीम शनिवारी सकाळी ११ वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडले होते. हसीमने घरून बाईक चोरून आणली होती. बराच वेळ ते घरी न परतल्याने हसीमच्या वडिलांनी त्याला फोन केला होता, तेव्हा त्याने “आम्ही फिरून लवकरच परत येतो” असे सांगितले होते. मात्र, रविवारी सकाळी या भीषण अपघाताची बातमीच घरी पोहोचली.
पोलिस तपास आणि मृताची पार्श्वभूमी
एसीपी (वेव्ह सिटी) प्रियश्री पाल यांनी सांगितले की, “दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र इक्राला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हसीमची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.”
मृत इक्रा नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती आणि तिचे दिल्ली पोलिसात भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र, एका चुकीच्या निर्णयामुळे आणि वेगाच्या हव्यासामुळे तिचे हे स्वप्न अधुरे राहिले. या घटनेमुळे पासोंडा परिसरात शोककळा पसरली असून, तरुणाई कडून सातत्याने अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी पालकांना आपल्या पाल्यांच्या सोशल मीडिया आणि वाहन चालवण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
