Wife Gym Trainer Husband Attack: देशभरात वेगवेगळ्या राज्यात पत्नीनं प्रियकराबरोबर मिळून पतीची हत्या केल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये डोकं चक्रावणारं प्रकरण घडलं आहे. जिम ट्रेनरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका महिलेने स्वतःच्या पतीला संपविण्याची योजना आखली. जिम ट्रेनरने तिच्या प्रेमासाठी पतीला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र पती थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शेजाऱ्यांच्या खबरदारीमुळे पती वाचल्याचा प्रकार समोर आला आहे.
२६ ऑक्टोबर रोजी ही घटना घटली. याचे सीसीटीव्ही चित्रण सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जिम ट्रेनरची प्रेयसी प्रिया सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी आपल्या घरातून बाहेर पडताना दिसते. त्यानंतर तीन मिनिटांनी म्हणजेच ५ वाजून २० मिनिटांनी जिम ट्रेनर प्रताप सिंह घरात शिरताना दिसतो. प्रियाचा पती शशांक कंथारिया (वय ३५) त्यांच्या लहान मुलीच्या बाजूला झोपलेला असतानाच प्रताप त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करतो. त्यानंतर ५ वाजून २३ मिनिटांनी तो तिथून बाहेर पडतो.
शेजाऱ्यांमुळे घटना उघडकीस
याचदरम्यान शशांक यांच्या शेजाऱ्याने प्रतापला घरातून बाहेर पडताना पाहिले. प्रताप इमारतीच्या बाहेर पडत असताना बाहेर रस्त्यावर काही जण मॉर्निंग वॉकसाठी आले होते. ज्याने प्रतापला घरातून बाहेर पडल्याचे पाहिले होते, त्याने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी जमलेले लोक आणि इमारतीचा सुरक्षा रक्षक प्रताप सिंहच्या मागे धावत जाऊन त्याला पकडतात.
सकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी परिसरातील अनेक लोक शशांक कंथारिया यांच्या घराबाहेर जमलेले दिसतात. यानंतर शशांक यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
प्रेमप्रकरण कसे सुरू झाले?
शशांक दिल्ली सरकारच्या एका कार्यालयात काम करतात. अतिरिक्त पोलीस आयुक्त सूर्यबली मौर्य सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया ज्या जिममध्ये जाते, त्या जिममध्ये प्रताप सिंह जानेवारी २०२६ मध्ये कामाला लागला होता. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले.
शशांकला याची कुणकुण लागल्यानंतर त्याने सप्टेंबर महिन्यात पत्नीला ताकीद देत संबंध संपविण्यास सांगितले. तसेच एकतर जिमला जाणे बंद कर किंवा प्रताप जिथे नसेल त्या जिमला जा, असेही त्याने सुचविले.
यानंतर शशांकने दिल्लीत दुसरीकडे घर शोधण्यास सुरुवात केली. रविवारी तो एक घर बघायला जाणार होता. मात्र प्रियाला हे घर आणि परिसर सोडायचा नव्हता. यातून दोघांचेही भांडण झाले. यानंतर प्रियाने याची माहिती प्रताप सिंहला दिली आणि त्यांनी शशांकला संपविण्याचा कट रचला.
ज्या दिवशी प्रतापने शशांकवर हल्ला केला. त्या दिवशी प्रियाने मुद्दामहून जिमला जाताना घराचे दार उघडे ठेवले होते. जेणेकरून प्रतापला आत जाता येईल. प्रतापने शशांकवर हल्ला करण्यासाठी दोन चाकू आणले होते. शेजारी राहणाऱ्या एमटी जोशी यांनी प्रतापच्या हाताला रक्त लागल्याचे सांगितले.

दोघांनाही अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया आणि तिचा प्रियकर प्रताप सिंहला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
