गाझियाबादमधील टीला मोड परिसरात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या या चकमकीत आरोपीला पोलिसांनी कंठस्नान घातले. विशेष म्हणजे, या आरोपीवर जाहीर करण्यात आलेली २५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम वाढवून ५०००० रुपये केल्यानंतर अवघ्या २४ तासांत ही कारवाई करण्यात आली.
नेमकी घटना काय?
मुझफ्फरनगरचा रहिवासी असलेला हा आरोपी पीडित मुलीचा सख्खा काका होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या चार वर्षांच्या पुतणीला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेले होते. घरात फक्त अंध आजोबा असताना त्याने या संधीचा फायदा घेतला. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका पार्क केलेल्या कारखाली फेकून दिला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती.
अशी झाली चकमक
डीसीपी धवल जैस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रँच आणि स्वॅट (SWAT) टीमला आरोपी टीला मोड परिसरात आपल्या दोन साथीदारांसह मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बाधला नहर कट परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी संशयित मोटारसायकलला थांबण्याचा इशारा केला असता, आरोपींनी पोलिसांवर थेट गोळीबार सुरू केला.
वेगाने जाणारी मोटारसायकल घसरल्याने आरोपी खाली पडले, मात्र त्यांनी पळून न जाता झाडाझुडपांचा आडोसा घेत पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये आरोपीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस आणि सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
या चकमकीच्या काही काळ आधीच सर्वोच्च न्यायालयाने गाझियाबाद पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले होते. दुसऱ्या एका बलात्कार-खून प्रकरणाचा संदर्भ देत न्यायालयाने पोलिसांची भूमिका “संवेदनहीन आणि अमानवीय” असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर गाझियाबाद पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
कुटुंबाची प्रतिक्रिया
चकमकीत नराधम काका मारला गेल्याची बातमी मिळताच पीडितेच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले. “माझ्या मुलीसोबत जे कृत्य त्याने केले, त्यानंतर त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नव्हता. पोलिसांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता, २०२५ मध्ये त्याने आपल्या मेहुणीवर चाकूने हल्ला केला होता आणि त्यानंतर एका विनयभंगाच्या प्रकरणातही त्याला अटक झाली होती. वारंवार गुन्हे करूनही तो जामिनावर बाहेर येत होता, मात्र यावेळच्या कृत्याने त्याच्या पापाचा घडा भरला.
बदलापूर आणि हैदराबाद प्रकरणाची आठवण
ज्याप्रमाणे बदलापूरच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस व्हॅनमध्ये गोळीबार केल्यानंतर एन्काउंटर झाला होता, किंवा हैदराबादमधील बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी नेले असता त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला आणि ते चकमकीत मारले गेले, अगदी तशाच स्वरूपाची कारवाई गाझियाबाद पोलिसांनी केली आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि पीडितेला त्वरित न्याय देण्यासाठी अशा कडक पावलांची चर्चा आता देशभर होत आहे.
