Ghaziabad Sisters Suicide Case: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जात आहे, तसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मोबाइल आणि कोरियन गेम्सच्या व्यसनापायी तीन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता या मुलींचे वडील चेतन कुमार यांनी तीन सख्ख्या बहिणींशी लग्न केले होते. अशी बाब समोर आली आहे. यापैकी दोन बहिणींकडून त्यांना या तीन मुली झाल्या होत्या. तर त्यांची एक प्रेयसीही होती, जिने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. अशीही बाब समोर आली आहे.
गाझियाबादच्या भारत सिटी सोसायटीमधील नवव्या मजल्यावरून तीन बहिणींनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीनही मुलींना कोरियन संस्कृतीबद्दल पराकोटीचे आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी तिघींचे मोबाइल फोन काढून घेतले होते. यामुळे मुलींना त्यांचा आवडीचा गेम खेळता आला नाही. तसेच त्या ॲप्लिकेशनवर मित्रांशी चॅट करू शकत नव्हत्या. नंतर हे फोन विकण्यात आल्याचे पोलीस म्हणाले.
दुर्घटनेच्या रात्री काय घडले?
ज्या रात्री तीन बहिणींना आत्महत्या केली. त्या रात्री त्यांनी आईचा मोबाइल घेतला होता. मात्र त्यात त्यांना कोरियन ॲप डाऊनलोड करता आले नाही. आईच्या मोबाइलची फॉरेन्सिक चाचणी केली असता त्यात कोरियन ॲप वापरल्याचा पुरावा आढळला नाही.
पोलिसांना जी हस्तलिखित सुसाइड नोट मिळाली, त्यावरील बोटांचे ठसे मिळविण्यासाठी सदर नोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली. याचा अहवाल येणे बाकी असल्याचे ट्रान्स हिंडन पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त निमिश पाटील यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले.
वडिलांची तीन लग्ने, प्रेयसीची आत्महत्या
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांनी सांगितले की, चेतन कुमार यांना तीन पत्नी आहेत. सुजाता, हीना आणि टीना अशी त्यांची नावे आहेत. या तिघीही सख्या बहिणी आहेत. पहिल्या पत्नीपासून एक तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन मुली होत्या. मुलींनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये वडिलांचा उल्लेख होता, मात्र आईबद्दलचा कोणताही उल्लेख आढळला नाही.
पोलिसांनी चेतन कुमार यांच्या भूतकाळाचाही शोध घेतला. २०१५ मध्ये चेतन कुमार यांच्या लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नंतर हे प्रकरण आत्महत्येचे असल्यामुळे सदर खटला बंद करण्यात आला होता.
