उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ११ वीच्या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. या एन्काउंटरनंतर आता उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं असून, कायदेशीर प्रक्रियेविना होणाऱ्या या कारवाईवर विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा उल्लेख करत गुन्हेगारांच्या पालकांना थेट शब्दांत इशारा दिला आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी उत्तर प्रदेशात ‘जंगलराज’ सुरू असल्याचा आरोप केला आहे.
नेमकी घटना काय होती?
गाझियाबादच्या खोडा भागात २८ जून रोजी एका १७ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. केवळ दुचाकीवरून झालेल्या वादाचे रुपांतर या हिंसक घटनेत झाले होते. आरोपीने या अल्पवयीन मुलाला गल्लीत बोलावून घेतले, त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने चाकूने सपासप वार करून तिथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘बकरी ईद’चा दिवस आणि मृत मुलाच्या आईचे काळजाचा थरकाप उडवणारे आरोप
या घटनेनंतर मृत मुलाच्या आईने ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना अत्यंत गंभीर आरोप केला आहे. “ईदच्या दिवशी एका मुलाने माझ्या मुलाला बहाण्याने बोलावून घेतले. त्याला विचारले की, तू कधी बकरा कापताना पाहिलं आहेस का? माझ्या मुलाने ‘नाही’ असं म्हणताच त्यांनी त्याच्यावर चाकूने वार केले. मला फक्त न्याय हवा आहे,” असा टाहो मृत मुलाच्या आईने फोडला. पोलिसांनी सुरुवातीला ढिसाळ कामगिरी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
रविवारी पहाटे पोलिसांकडून आरोपीचा एन्काउंटर
या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीवर पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रविवारी (३१ मे) पहाटे ३.३० च्या सुमारास गाझियाबादच्या वसुंधरा भागात हा आरोपी आपल्या एका साथीदारासह मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पोलिसांवर थेट गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या जबाबाबी गोळीबारात मुख्य आरोपी जागीच ठार झाला, तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक, “नालायक अवलाद…” म्हणत…
या एन्काउंटरनंतर बिजनोर येथील एका सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणाचेही नाव न घेता गुन्हेगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कडक शब्दांत सुनावले. “मैत्रीच्या नावाखाली चालणारी ही गुंडगिरी आणि चाकूबाजी उत्तर प्रदेशात अजिबात सहन केली जाणार नाही. जर कोणी आपल्या ‘नालायक अवलादीला’ सरळ करू शकत नसेल, तर ते मोठी चूक करत आहेत. गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल,” असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला.
“हा खरा न्याय नव्हे, हे तर जंगलराज”; विरोधक आक्रमक!
या एन्काउंटरवरून आता उत्तर प्रदेशचे राजकारण कमालीचे तापले असून विरोधकांनी योगी सरकारला घेरले आहे.
- उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले, “राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. लखनऊमध्ये बिल्डरची हत्या होते, गाझीपूरमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाला मारले जाते. योगी सरकार खऱ्या न्यायाऐवजी ‘फेक एन्काउंटर’वर (बनावट चकमकी) भर देत आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा बऱ्याच अंशी बोजवारा उडाला असून जंगलराज सुरू आहे.”
- समाजवादी पक्षाचे (SP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी या कारवाईवर धार्मिक भेदभावाचा गंभीर आरोप केला. आझमी म्हणाले, “उत्तर प्रदेशात विशिष्ट धार्मिक दृष्टिकोन ठेवून एन्काउंटर केले जात आहेत. जर पीडित व्यक्ती मुस्लिम असेल तर इतक्या वेगाने कारवाई होत नाही. देशात संविधान आणि कायदा आहे, गुन्हेगाराला फाशी द्यायची असेल तर ती न्यायालयाने द्यावी. गुन्हेगार कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यावर समान कारवाई झाली पाहिजे.”
आरोपीच्या घरावर चालणार बुलडोझर!
एन्काउंटरच्या दुसऱ्याच दिवशी गाझियाबाद प्रशासनाने आरोपीच्या घराबाहेर १५ दिवसांची नोटीस चिकटवली आहे. हा परिसर सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे महसूल विभागाच्या प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. उत्तर प्रदेश महसूल संहितेच्या (UP Revenue Code) कलम १३६ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली असून, घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपीच्या वडिलांसह एकूण तीन जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ‘एन्काउंटर आणि बुलडोझर’ राजकारणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
