उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये २८ मे रोजी ईदच्या दिवशीच सूर्य प्रताप चौहान या तरुणाची हत्या करण्यात आली.या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत त्यांनी निदर्शने केली होती. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असद हा पोलीस चकमकीत ठार झाला आहे, तर त्याच्या वडिलांसह इतर तीन आरोपींना गुन्ह्यातील सहभागाबद्दल अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांच्या गोळीबारात असदचा मृत्यू
असद हा २८ मे रोजी झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेपासून फरार होता आणि त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शनिवारी उशिरा रात्री खोडा आणि इंदिरापुरम पोलिसांच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या गोळीबारात तो मारला गेला. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या गोळीबारात एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हत्येप्रकरणी पोलीस उपायुक्त धवल जैस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पाच जणांवर आरोप करण्यात आले आहेत. चकमकीपूर्वी असदचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सतत छापे टाकत होती. जैस्वाल म्हणाले, “या प्रकरणात पाच जणांची आरोपी म्हणून नोंद करण्यात आली. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपी असद फरार होता. त्याला पकडण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली होती आणि त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.” गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असद त्याच्या साथीदारांकडून पैसे गोळा करून परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी मोहीम सुरू केली.
“नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात असद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले”, असे जैस्वाल यांनी पुढे सांगितले. चकमकीच्या ठिकाणाहून एक मोटारसायकल आणि एक शस्त्रास्त्र हस्तगत करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या हत्येप्रकरणी नवाब, फरहान आणि आतिफ अशा आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. नवाब हा मृत आरोपी असदचा पिता आहे.
तरुणाची हत्या का झाली होती?
चौकशीदरम्यान फरहानने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, २८ मे रोजी दुपारी असद आणि सूर्य यांच्यात मोटारसायकल चालवण्यावरून झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडला. या वादानंतर त्याने आणि नवाबने असदसोबत मिळून सूर्य प्रतापची हत्या करण्याचा कट आखला. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फरहानने चौकशीत कबूल केले की आरोपींनी दुपारी ३.३० च्या सुमारास नवनीत विहारमध्ये सूर्य प्रतापला गाठले. त्याने असदच्या हातात चाकू दिला, तर नवाबने त्याला चिथावणी देत, “आज याची कहाणी संपवून टाक”, असे म्हटले. चाकूने सपासप वार झाल्यामुळे सूर्य प्रताप रस्त्यावर कोसळला. तो मरण पावला आहे असे समजून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
