Ghuskhor Pandit : घुसखोर पंडत या चित्रपटाच्या नावावरुन झालेला वाद सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की जर तुम्ही या चित्रपटाचं नाव बदललं नाही तर तुम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने म्हटलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर समाजातल्या कुठल्याही वर्गाचा अपमान करणं ही बाब खपवून घेतली जाणार नाही. रचनात्मक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, पण त्यावर अंकुश हवाच कारण तुम्ही उद्या कुठल्याही समाजाची बदनामी करु शकाल हे चालणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निर्मात्यांना चित्रपटाचं नाव बदलण्याचे निर्देश दिले आहेत.
पुढच्या सुनावणीत काय होणार?
सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की पुढच्या सुनावणीत हे पाहिलं जाईल की निर्माता आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाचं नाव बदलण्यासाठी काय पावलं उचलली. घूसखोर पंडत हा चित्रपट १९ फेब्रुवारीला आम्ही या नावासह का प्रदर्शित होऊ द्यायचा? जोपर्यंत चित्रपटाचं नाव बदललं जाणार नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यास आमची संमती नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. कोर्टाने हे अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे की जर घुसखोर पंडत हे नाव बदलण्यात आलं नाही तर चित्रपट प्रदर्शित करण्यास संमती मिळणार नाही. जस्टिस बी. व्ही. नागरत्ना यांनी असंही म्हटलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही समाजातील विशिष्ट वर्गाचा अपमान करु शकत नाही.
मंगळवारी काय घडलं होतं?
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या घुसखोर पंडत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या याचिकेसंदर्भात सुनावणी घेतली होती. याचिका कर्त्यांनी हे म्हटलं होतं की चित्रपटाचं शीर्षक हे समाजातील विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावणारं आहे. तसंच अशा प्रकारच्या चित्रपटाच्या नावामुळे धार्मिक तेढ वाढण्याची शक्यता आहे. या सुनावणीच्या दरम्यान नेटफ्लिक्सने न्यायालयाला हे सांगितलं की निर्माते चित्रपटाचं नाव बदलण्यास तयार आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की नाव बदलण्यासंबंधीचं आश्वासन आम्हाला निर्माता आणि दिग्दर्शकांनी दिलं आहे. या चित्रपटाचा प्रचार करणारं सगळं साहित्य आम्ही हटवलं आहे. ज्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही या चित्रपटाचं नाव बदला असे निर्देश निर्माता आणि दिग्दर्शकांना दिले आहेत.
पुढच्या सुनावणीला बदललेल्या नावाचा विचार करुनच या-सर्वोच्च न्यायालय
घूसखोर पंडत या चित्रपटाचा टिझर आल्यानंतरच वाद सुरु झाला. सदर चित्रपट नीरज पांडेंनी दिग्दर्शित केला आहे तर अभिनेता मनोज वाजपेयी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. निर्माता आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या नव्या नावाचा विचार करुन ठेवावा आणि त्या नावासह पुढच्या सुनावणीला उपस्थित असावं असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारची नावं ही चर्चा होण्यासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी ठेवली जातात असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

