गुलाम नबी आझादांची दबावाची खेळी ; जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी पक्षनेतृत्वाचे प्रयत्न

सध्या आझाद जम्मू-काश्मीरमध्ये असून त्यादरम्यान समर्थकांनी राजीनामे दिल्याने पक्षनेतृत्वाचे आझादांकडे लक्ष वेधले गेले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये नजीकच्या काळात होऊ  शकणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दबावाची खेळी केली असल्याचे लक्षात आल्यानंतर पक्षनेतृत्वाने प्रदेश काँग्रेसमधील संभाव्य फूट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आझाद यांच्या सुमारे २० समर्थक पदाधिकारी, माजी आमदार व मंत्र्यांनी अचानक राजीनामे दिले असून तसे पत्र त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी तसेच, जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांना पाठवले आहे. यातील बहुतांश समर्थक विद्यमान प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांची पदावरून हकालपट्टी करून गुलाम नबी आझाद यांची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत. सध्या आझाद जम्मू-काश्मीरमध्ये असून त्यादरम्यान समर्थकांनी राजीनामे दिल्याने पक्षनेतृत्वाचे आझादांकडे लक्ष वेधले गेले आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या आझाद, मीर तसेच रजनी पाटील यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या श्रीनगर व नंतर जम्मूच्या दौऱ्यात असंतुष्ट गटातील पदाधिकाऱ्यानी गाऱ्हाणी मांडलेली होती. वादातून मार्ग काढण्याचे आश्वासनही राहुल यांनी दिले होते, तरीही राजीनामे दिले जात असतील तर हा पक्षनेतृत्वावर दबाब आणण्याचा भाग आहे. त्यामुळे आझाद नजीकच्या काळात काय भूमिका घेतात हे पाहून ‘मध्यस्थी’ करण्याकडे पक्षनेतृत्वाचा कल असल्याचे समजते.

राहुल गांधी भारताबाहेर आहेत, तर रजनी पाटीलही महाराष्ट्रात आहेत. दोघेही दिल्लीत परतल्यानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील असंतुष्टांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत आझाद यांच्याशीही सविस्तर चर्चा केली जाण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवा

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या फेररचनेचे काम पूर्ण झाल्यानंतर कदाचित मे महिन्यामध्ये या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. आगामी पाच-सहा महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये वेगवान राजकीय घडामोडी होणार असतील, तर आपल्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जावी, अशी मागणी आझादांनी समर्थकांच्या माध्यमातून केली असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आझादांची राजकीय ताकद असून त्यांचे अब्दुल्ला पिता-पुत्रांशी सलोख्याने संबंध आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘नॅशनल कॉन्फरन्स’शी युती करण्यासाठी आझादांची मदत लागणार असल्यानेही प्रदेश काँग्रेसमधील वादाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे सांगितले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ghulam nabi azad s pressure technique ahead of assembly election zws

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या