Gig Workers Strike on 31st December: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग उत्साहात आहे. आज २०२५ चा निरोप देत असताना तुम्ही जर घरातून जेवणाची ऑर्डर किंवा काही वस्तू मागवणार असाल तर जरा थांबा. कारण वर्षाच्या अखेरच्या दिवशी जेव्हा डिलिव्हरी व्यवसाय तेजीत असण्याची शक्यता होती, त्याच दिवशी या क्षेत्रात काम करणाऱ्या गिग कामगारांनी संप पुकारला आहे. आज झोमॅटो, स्विगी, ब्लिकिंट, झेप्टो आणि ॲमेझॉन सारख्या डिलिव्हरी देणाऱ्या ॲप्सच्या कामगारांनी राष्ट्रव्यापी संपाचे आवाहन केले आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी सगळीकडेच उत्साह ओसंडून वाहत असतो. हॉटेल्स, रेस्टॉरंट गर्दीने फुलतात. अशातच गेल्या काही वर्षांत डिलिव्हरी ॲप्सच्या वाढत्या पसाऱ्यामुळे घरच्या घरी आनंद साजरा करण्याचीही पद्धत रुढ झाली. ३१ डिसेंबर हा डिलिव्हरी व्यवसायासाठी सर्वात व्यस्त दिवसांपैकी एक दिवस आहे. गिग कामगारांच्या संपामुळे आता वितरण, व्यापार आणि ई-कॉमर्स सेवांवर परिणाम होऊ शकतो.
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी हा संप पुकारला असून यात महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू सारख्या राज्यातील कामगार संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या संघटनांनी दावा केला आहे की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अन्न वितरण, क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्स ॲप्समधून सर्व डिलिव्हरी कामगार लॉग आऊट करतील.
संपाचे कारण काय?
कामगार संघटनांच्या मते, ॲप्स आधारित व्यवसायाचा कणा असलेल्या डिलिव्हरी कामगारांची कमाई कमी होत असताना त्यांना अधिक तास काम करण्यास भाग पाडले जात आहे. डिलिव्हरी कामगारांना असुरक्षित डिलिव्हरी टार्गेट्स, नोकरीची कोणतीही हमी नसणे, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठेचा अभाव आणि मूलभूत सामाजिक सुरक्षेचा कोणतेही संरक्षण नसणे, अशा प्रकारच्या ताणाला सामोरे जावे लागत आहे.
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांना पाठवलेल्या पत्रात संघटनेने सांगितले की, IFAT ने म्हटले की, देशभरातील सुमारे ४,००,००० ॲप आधारित वाहतूक आणि वितरण कामगारांचे प्रतिनिधित्व ते करतात. संघटनेने यापूर्वी २५ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळे अनेक शहरांतील ५० ते ६० टक्के सेवा विस्कळीत झाल्या.
