Giorgia Meloni Selfie Viral Video : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) या नेहमीच त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखल्या जातात. आताही जॉर्जिया मेलोनी सध्या एका हटके सेल्फीमुळे चर्चेत आहेत. एका तरुणाने मेलोनी यांच्यासोबत सेल्फी काढला आणि फोटो काढतानाच त्यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र, मेलोनी यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमका प्रकार काय?
मेलोनी एका सार्वजनिक कार्यक्रमात असताना एका तरुणाने त्यांच्याकडे सेल्फी घेण्याची विनंती केली. मेलोनी यांनीही हसून त्याला प्रतिसाद दिला. मात्र, फोटो काढत असतानाच तो तरुण म्हणाला, “मी तुमच्या त्या सार्वमताला नाही’ असेच मत देणार आहे, ज्यासाठी तुम्ही ‘हो’ म्हणण्याचे आवाहन करत आहात.”
पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर थेट विरोध दर्शवूनही मेलोनी अजिबात विचलित झाल्या नाहीत. त्यांनी अत्यंत शांतपणे आणि हसत उत्तर दिले, “काही हरकत नाही, हीच तर लोकशाही आहे.”
काय आहे हे सार्वमत?
पंतप्रधान मेलोनी इटलीच्या राज्यघटनेत काही मोठे बदल करू इच्छितात, ज्याला त्यांनी ‘मदर ऑफ ऑल रिफॉर्म्स’ म्हटले आहे. या बदलांनुसार पंतप्रधानांची निवड थेट जनतेद्वारे व्हावी, असा त्यांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर देशात सार्वमत (Referendum) होणार असून, मेलोनी त्याचे समर्थन करत आहेत, तर विरोधक त्याला विरोध करत आहेत. आपल्याच समर्थकांमध्ये उभे राहून थेट विरोध करणाऱ्या तरुणाला मेलोनी यांनी ज्या संयमाने उत्तर दिले, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे.
२२ आणि २३ मार्च २०२६ रोजी इटलीमध्ये एका मोठ्या संवैधानिक सार्वमतासाठी मतदान होत आहे. या सुधारणांअंतर्गत मेलोनी सरकारला न्यायमूर्ती आणि सरकारी वकील (Prosecutors) यांचे कार्यक्षेत्र वेगळे करायचे आहे, जेणेकरून न्यायव्यवस्था अधिक निष्पक्ष होईल असा त्यांचा दावा आहे. मात्र, विरोधकांनी याला लोकशाहीसाठी धोका आणि सत्तेचे केंद्रीकरण म्हटले आहे. हे सार्वमत मेलोनी यांच्या लोकप्रियतेची मोठी चाचणी मानली जात आहे. पराभव झाल्यास राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी या निकालाचा परिणाम २०२७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर होऊ शकतो.
