Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरू असून युद्धाला आज १५ दिवस पूर्ण झाले आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा देखील मृत्यू झाला. मात्र, तरी अद्यापही हे युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्यामुळे जगातील तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांना कच्च्या तेलाची कमतरता भासेल का? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचं नेमकं कारण काय आहे? या युद्धातून कुणाला काय मिळेल आणि तेल संघर्षाची कारणं आणि इतिहास काय आहे? यावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लोकसत्ताच्या मुक्त संवाद या कार्यक्रमात सविस्तर विश्लेषण केलं आहे.
गिरीश कुबेर काय म्हणाले?
तेल हेच अनेक युद्धाचं कारण असतं आणि तेच कारण अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचं देखील आहे का? असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना गिरीश कुबेर यांनी म्हटलं की, “पहिल्या महायुद्धापासून म्हणजे १९१४ पासूनच्या प्रत्येक युद्धाचं कारण हे तेलच आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू व्हायचं होतं, तेव्हा इंग्लंडमधील जहाजं कोळशावर चालणारी असायची. तेव्हा कोळशाचं वर्णन किंगकोल असं केलं जायचं. त्या कोळशामुळे इंग्लंडमध्ये अपघात व्हायचे. कारण थंडीच्या काळात कोळशाचा धूर एवढा व्हायचा आणि त्यामुळे रस्त्यावर दिसेनासं व्हायचं. जेव्हा जर्मनी आणि युरोपमधला ताणतणाव निर्माण झाला तेव्हा विन्सटन चर्चिल हे सरकारमध्ये नव्हते. त्यावेळी झालं असं की रुडॉल्फ डीजल या व्यक्तीने जर्मनीमध्ये काही बोटी तयार केल्या, म्हणजे त्या बोटींना एक इंजिन जोडलं आणि मग लक्षात आलं की त्या बोटी जोरात धावू शकतात, त्यासाठी कोळशाची गरज नाही. तेव्हा रुडॉल्फ डीजल हे अशा मताचे होते की हे तंत्रज्ञान सर्वांना द्यायला हवं, म्हणजे फक्त जर्मनीत राहायला नको. सर्व जगाने ही प्रगतीची संधी साधावी असं मत त्याचं होतं. त्यामुळे ते त्या मोहिमेसाठी इंग्लंडला जायला निघाले. मात्र, त्यानंतर त्याचं काय झालं? हे आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही”, असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
“तेव्हा अनेकांच्या हे लक्षात आलं की रुडॉल्फ डीजलने जे काही तंत्रज्ञान आणलं, त्यामुळे वाहतुकीच्या क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकेल. १९१२-१३ या दरम्यानची ही घटना आहे. तेव्हा रुडॉल्फ डीजलच्या तंत्रज्ञानामुळे विन्सटन चर्चिल यांच्या लक्षात आलं की या माध्यमातून आपल्याला कोळशावर चालणाऱ्या बोटींचं रुपांतर तेलावर चालणाऱ्या बोटींवर करता येईल. त्यानंतर विन्सटन चर्चिल यांनी तो कार्यक्रम हाती घेतला. पुढे इंग्लंडमधील शेवटचं जे जहाज होतं, त्याचं रुपांतर तेलावर चालणाऱ्या जहाजात झालं आणि त्यानंतर काहीच दिवसांत पहिल्या महायुद्धाला सुरूवात झाली. पहिलं महायुद्ध इंग्लंड जिंकलं, ते केवळ रुडॉल्फ डीजलमुळे. आता दुसऱ्या महायुद्धाचाही मुद्दा असाच आहे”, असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
“गेल्या काही वर्षांत किंवा इतिहासात आपण जे युद्ध पाहिले आहेत. त्या सगळ्या युद्धाचं मूळ हे तेलच आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलर का हारला? कारण त्याला तेलाचा पुरवठा झाला नाही. कारण इंधनाअभावी काहीच करता आलं नाही. हिटलरचं वाक्यच होतं की तेलाने आम्ही हरलो आणि तेलानेच इंग्लंडला जिंकून दिलं. त्यामुळे ते युद्ध असो किंवा आणखी भारत-पाकिस्तान युद्ध असो. या सगळ्यांच्या मागे तेल असतं”,असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
“जर आपण इतिहासाकडे पाहिलं तर मला वाटतं की जगाची दोनच गटात विभागणी होऊ शकते. एक म्हणजे अमर्याद ऊर्जा स्रोत असलेले आणि ऊर्जा स्रोत नसलेले देश. त्यामुळे ऊर्जा स्रोत असलेले आणि ऊर्जा स्रोत नसलेल्यांवर मालकी मिळवणं किंवा त्यांना पराभूत करणं, यातूनच हे झालेलं आहे. आता आत्ताचं युद्ध देखील तेच आहे. आता व्हेनेझुएलामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना राजवट बदल करावी वाटते. तसंच इराणमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांना राजवट बदलावी वाटते, याचं कारण हे तेलच आहे”, असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
