Girish Kuber Analysis on Marco Rubio’s recent India visit: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी नुकताच भारताचा दौरा केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील या महत्त्वाच्या दौऱ्याचे आणि भारत-अमेरिका संबंधांमधील बदलत्या समीकरणांचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टीकोन’ या व्हिडिओ सिरीजमध्ये अत्यंत परखड विश्लेषण केले आहे. रुबियो भारतात आले आणि प्रथा मोडून थेट पंतप्रधान मोदी यांना भेटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी समकक्ष मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांच्याप्रमाणेच भारताबद्दलची घोषणा करण्याचा कित्ता रुबियो यांनीही गिरवला.

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी असो किंवा रशियाकडून होणारी तेलाची आयात, भारतीय उद्योगपतींची अमेरिकीतील गुंतवणूक असो.. याबाबत अनेकदा भारताच्या आधी भारत काय करणार याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. रुबियो यांनी ट्रम्प यांचीच री ओढताना व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा भारत भेटीवर येणार असल्याची घोषणा केली, अशी माहिती गिरीश कुबेर यांनी सुरुवातीला दिली. दृष्टीकोन या व्हिडीओ मालिकेच्या या भागात भारत-अमेरिकेच्या बदल्या संबंधांवर पुढे त्यांनी विस्तृत भाष्य केले.

“फक्त व्हेनेझुएलाच्या राष्ट्रप्रमुखांची भेटच नाही तर भारत आणि अमेरिकेमध्ये ५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार होणार असल्याची घोषणाही रुबियो यांनी केली. भारतात येण्याआधी याच रुबियो यांनी पाकिस्तानवर स्तुतीसुमने उधळली होती. पाकिस्तान आमचा धोरणात्मक भागीदार कसा आहे, इराणचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची कशी मदत होत आहे, तसेच या चर्चेचे सुकाणू पाकिस्तानच्या हाती कसे आहे? इत्यादी कौतुकाचे उद्गार याच रुबियो यांनी काढले होते. मात्र भारताच्या बाबतीतली वागणूक वेगळी होती, याचा अर्थ काय? यावर विचार करणे गरजेचे आहे”, असे मत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

तोपर्यंत अमेरिकेने भारताची तळी उचलली

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कालखंडात भारताला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, याबद्दलचा लेखाजोखा गिरीश कुबेर यांनी मांडला. ते म्हणाले, “जोपर्यंत भारत हा चीनला पर्याय ठरू शकतो किंवा पर्याय ठरण्यामध्ये मदत करू शकतो, असे दिसत होते. तोपर्यंत भारताची अमेरिकेकडून तळी उचलली गेली. २००८ सालचा भारत आणि अमेरिकेत झालेला अणुकरार असो, त्यानंतर भारताला मिळालेली वागणूक असो किंवा बायडेन यांच्या काळात भारताला दिलेल्या विविध सवलती असो… भारताला अमेरिकेने अत्यंत प्रेमाने वागवले. यांच्यात अमेरिकेचा एकच स्वार्थ होता. शेजारच्या चीनला संतुलन राखण्यासाठी आणि व्यापार, लष्कर आणि भू-राजकीय प्रश्नांमध्ये भारत हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असे अमेरिकेला सातत्याने वाटत होते. यातूनच चीनविषयक आपल्या भूमिका तयार झाल्या. पण ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मिळणारी वागणूक सन्मानाची आहे, असे निश्चितच म्हणता येणार नाही.”

donald trump decisions about tariff china and us trade war girish kuber analysis
“डोनाल्ड ट्रम्प हे वरकरणी कितीही मतलबी, चक्रम वाटले तरीही..” गिरीश कुबेर यांचं विश्लेषण काय?

ग्रीन कार्डचा विषय अमेरिकेतील भारतीयांसाठी धोक्याचा

रुबियो भारतात येण्याआधी अमेरिका सरकारने ‘ग्रीन कार्ड’ धारकांसाठी विचित्र निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीन कार्डद्वारे अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्याची परवानगी मिळते. अमेरिकेत ज्यांना ज्यांना ग्रीन कार्ड दिले आहे, त्या सर्वांनी देश सोडून जाण्याचा आदेश अमेरिकेने काढला आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका अमेरिकावासी भारतीयांना बसणार आहे. ग्रीन कार्ड धारकांची संख्या प्रचंड आहे. या निर्णयामुळे त्यांना अमेरिकेतील वास्तव्यासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मायदेशी यावे लागणार असून त्यानंतर नव्याने परवानगी मिळाली तरच त्यांना परत अमेरिकेत जाता येईल. यापूर्वी अमेरिकेत राहूनच ग्रीन कार्ड धारकांना व्हिसासाठी अर्ज करता येत होता. एवढे सगळे होऊनही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो भारतात आल्यानंतर आपण याबद्दल ‘ब्र’देखील काढला नाही. यादृष्टीने हे सर्व धोक्याचे दिसते, असे विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केले.

चीनसमोर आपली उपयुक्तता संपली का?

जर चीनला भारत हा पर्याय ठरत असेल तर भारताशी अमेरिका अशी वागली असती का? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे सोव्हिएत युनियन आणि त्यानंतर अमेरिकेचे पाकिस्तानशी वाढलेली जवळीक. सोव्हिएत युनियनला रोखण्यासाठी पाकिस्तानचा उपयोग होऊ शकेल, या विचाराने त्यांचे लांगुलचालन करण्यात आले. त्यांची उपयुक्तता संपल्यानंतर पाकिस्तानला अमेरिकेने वाऱ्यावर सोडले. दुर्दैवाने आपण अमेरिकेसमोर इतके लेचेपेचे कधीच नव्हतो. पाकिस्तान गृहीत धरावा असा देश राहिला. मात्र आपण असे कधीच नव्हतो. लोकशाही देश म्हणून आपली स्वतःची उपयुक्तता होती. चीनला टक्कर देण्याची क्षमता असलेला देश म्हणून आपली ओळख होती. ही क्षमता संपली म्हणून अमेरिका आपल्याशी असा वागायला लागला आहे का? असा प्रश्न वाटावा अशी परिस्थिती दिसत असल्याचे गिरीश कुबेर म्हणाले.

मंदावलेली अर्थव्यवस्था कारणीभूत?

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका ज्यापद्धतीने आपल्याशी वागत आहे, त्याचा अर्थ वरील निष्कर्षाशी जोडण्याइतके तपशील सध्या समोर नसले तरी आपली मंदावलेली अर्थगती यासाठी कारणीभूत आहे का? या प्रश्नाचे निमित्ताने चर्चा करावी लागेल. या प्रश्नाशी आपण जर प्रामाणिकपणे भिडलो तरच अमेरिकेच्या अरेला कारे करू शकतो. अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. अन्यथा अमेरिका जो आपला सातत्याने अपमान करत आहे, तो सहन करत पुढे जाण्याखेरीज पर्याय राहणार नाही, असे विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केले.