चोरी करणारे ‘लव्ह पार्टनर्स’ गजाआड

सुरुवातीला हे दोघेही एका मोठ्या ग्रुपच्या माध्यमातून या गुन्हेगारीकडे वळले. तेव्हा त्यांना ड्रग्ज चोरण्याचे काम दिले जायचे. त्यावेळी ते मित्र-मैत्रीण होते, थोडे वयात आल्यावर या दोघांमध्ये प्रेम फुलले.

प्रतिनिधिक छायाचित्र

लव्ह पार्टनर्स एकत्र मिळून कधी कुठे फिरायला जातात तर कधी एकत्र डिनर नाहीतर एखादा चित्रपट पाहतात. पण नुकतेच असे एक लव्ह पार्टनर्स समोर आले आहेत जे एकमेकांच्या सोबतीने चोरी करतात. विशेष म्हणजे त्यांची नावेही अतिशय वेगळी असून त्या नावाने त्यांना बरेच जण ओळखतात. हे दोघेही २० वर्षांच्या आसपास असून त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांनी साखळीचोरी आणि वाहन चोरीचे काही गुन्हे कबूल केले आहेत. आतापर्यंत ते अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर आरोप असूनही त्यांना अटक करण्यात आली नव्हती.

या मुलीचे नाव प्रिती असून ती दाल-रोटीची मुलगी म्हणून ओळखली जाते. तिच्या कुटुंबाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. तर मुलाचे नाव मॉरिसन आहे. हा मुलगा अनाथ असून त्याला बऱ्याच लहानपणापासून चोरी करण्याची सवय होती. हे दोघेही एकमेकांचे शेजारी होते आणि मुल्तानी ढांडा येथे राहत होते. सुरुवातीला हे दोघेही एका मोठ्या ग्रुपच्या माध्यमातून या गुन्हेगारीकडे वळले. तेव्हा त्यांना ड्रग्ज चोरण्याचे काम दिले जायचे. त्यावेळी ते मित्र-मैत्रीण होते, थोडे वयात आल्यावर या दोघांमध्ये प्रेम फुलले. मग त्यांनी हा ग्रुप सोडून देऊन एकत्रितरित्या चोरी करायचे ठरवले. त्याप्रमाणे नियोजन करुन ते वेगवेगळ्या पद्धती वापरुन एकत्रित चोरीही करु लागले.

बाईक आणि स्कूटर यांची चोरी करुन ते ठराविक बाजारात आपला निशाणा शोधण्यासाठी बराच काळ फिरत असत. मॉरीसन गाडी चालवायचा आणि प्रिती त्याच्या मागे बसून साखळी ओढण्याचे काम करायची, तिचे राहणीमान मुलांप्रमाणेच होते. अशाप्रकारे दोन जण चोरी करत असल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र त्यांचा छडा लागत नव्हता. अखेर दिल्लीच्या करोलबाग भागात एका मोठ्या व्यावसायिकाची पत्नी त्यांच्या चोरीची शिकार झाल्यानंतर या चोर प्रेमी युगुललाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. कारपाशी उभ्या असलेल्या या महिलेची पर्स ओढून दोघे जण पसार झाले. याठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्या दोघांची ओळख पटण्यास मदत झाली. एका बागेत गप्पा मारत बसलेले असताना त्यांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Girl and her boyfriend together doing chainsnaching got arrested in karol bagh

ताज्या बातम्या