बदाऊँ :आधार कार्डावरील तपशिलात चुका ही काही दुर्मीळ बाब नाही. पण उत्तर प्रदेशात आधार कार्डावरील चुकीच्या उल्लेखामुळे एका बालिकेला सरकारी शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे.

या मुलीच्या नावाच्या जागी ‘मधु का पाँचवा बच्चा’असे लिहिले होते, तसेच कार्डावर आधार क्रमांक नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या आधार कार्डाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर सर्वत्र पसरले आहे.

बिलसी तालुक्यातील रायपूर खेडय़ाचा रहिवासी दिनेश हा त्याची मुलगी आरती हिच्या शाळा प्रवेशासाठी शनिवारी गावातील प्राथमिक शाळेत गेला होता. एकता वर्षने नावाच्या शिक्षिकेने आधार कार्डावरील चुकीमुळे मुलीला प्रवेश देण्यास नकार दिला. मुलीच्या आधार कार्डात दुरुस्ती करून आणा, असे तिने दिनेशला सांगितले.

‘आधार कार्ड हे टपाल कार्यालये आणि बँकांमध्ये तयार केले जाते. घोर निष्काळजीपणामुळे ही चूक झालेली आहे. या संबंधात आम्ही बँका व टपाल कार्यालयांना सतर्क करू आणि अशा निष्काळजीपणात सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल’, असे जिल्हा दंडाधिकारी दीपा रंजन म्हणाल्या.