Airbags Cause Death of A Girl after Accident in Kerala: भारतात अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सरकार व प्रशासनाला चिंतेत टाकणारी आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची कारणं शोधून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी जसे प्रत्यक्ष रस्त्यावर सूचना फलक, गतीरोधक, वाहन व वेगानुसार वेगवेगळ्या मार्गिका असे उपाय केले जातात तसेच गाडीच्या आतही काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कारमध्ये बसवण्यात येणाऱ्या एअरबॅग्ज त्यातताच एक प्रकार. पण या एअरबॅगमुळेच एका २ वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकीकडे सरकारकडून गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने एअरबॅग्ज बसवण्याचा आग्रह केला जात असताना दुसरीकडे या दुर्दैवी घटनेमुळे या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. द प्रिंटनं दिलेल्या वृत्तानुसार केरळमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातल्या कोट्टक्काल भागात हा अपघात झाला.

नेमका अपघात कसा झाला?

या मुलीचं कुटुंब एका कारमधून केरळच्या कोट्टक्काल भागातून जात असताना महामार्गावर ही घटना घडली. यावेळी गाडीमध्ये चारजण व ही २ वर्षांची चिमुकली प्रवास करत होती. सदर मुलगी गाडीत पुढे चालकाच्या सीटच्या बाजूला असणाऱ्या सीटवर तिच्या आईसोबत बसली होती. आईनं आपल्या मुलीला मांडीवर बसवलं होतं. महामार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीची समोरच्या एका टँकरला धडक बसली.

गाडीमध्ये एअरबॅग्ज बसवल्या होत्या. ज्या क्षणी ही धडक झाली, त्याक्षणी एअरबॅग्ज उघडल्या. या एअरबॅग्ज गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात येतात. विशेष म्हणजे अशाच अपघाताच्या वेळी आतील प्रवाशांना कुठेही धडकून इजा होऊ नये, यासाठी या एअरबॅग्जची सोय करण्यात आलेली असते. या अपघाताच्या वेळीही उघडलेल्या एअरबॅग्जमुळे आतील प्रवाशांना वाचवलं खरं, पण आईच्या मांडीवर बसलेल्या या चिमुकलीसाठी मात्र समोर उघडलेली एअरबॅग मृत्यूचं कारण ठरली.

तुमच्या गाडीमध्ये एअरबॅग आहे का? एअरबॅग वाचवू शकते तुमचा जीव; जाणून घ्या कसं?

श्वास गुदमरून चिमुकलीचा मृत्यू

आईच्या मांडीवर बसलेल्या मुलीच्या तोंडावरच अपघातानंतर एअरबॅग उघडली. त्यामुळे हवेच्या दाबामुळे चिमुकलीचा पूर्ण चेहरा एअरबॅगनं झाकला गेला. त्यामुळे श्वास गुदमरून या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं द प्रिंटच्या वृत्तात म्हटलं आहे. या मुलीच्या आईसह गाडीतील इतर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यामुळे ज्या एअरबॅग्जमुळे गाडीतील इतर चार जणांचा जीव वाचला, तीच एअरबॅग चिमुकलीसाठी मात्र जीवघेणी ठरली!

Story img Loader