एक तरुणी मंदिरात व्हिडीओ रिल शूट करत होती. त्यावेळी तिला एका पोलिसाने अडवलं आणि व्हिडीओ शूट करु नकोस असं सांगितलं. ज्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर लोक विविध प्रकारे व्यक्त होत आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असे रिल्स शूट करायला हवेत की नकोत? याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

व्हायरल क्लिपमध्ये नेमकं काय आहे?

एका मंदिरात एक तरुणी एका गाण्यावरचा व्हिडीओ शूट करताना दिसते आहे. ज्यानंतर एक पोलीस येतो आणि तिला व्हिडीओ शूट करु नकोस म्हणून अडवतो. ही मुलगी त्या गाण्यावर नाचत असते आणि व्हिडीओ शूट करत असते. पण तिला व्हिडीओ शूट करणं आणि नाचणं दोन्हीही थांबवावं लागतं हे या व्हायरल व्हिडीओत दिसतं आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार त्याच्या मोबाइल कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडीओ त्याने पोस्ट केला. ज्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. तसंच हा व्हिडीओ नेमका कुठल्या मंदिरातला आहे हे देखील स्पष्ट होत नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर लोक कशाप्रकारे व्यक्त होत आहेत?

सोशल मीडियावर या व्हिडीओवरुन युजर्स विविध मतं मांडत आहेत. एक युजर म्हणतो पोलीस अधिकाऱ्याने जे केलं ते योग्य आहे. मंदिरातलं वातावरण, तिथलं पावित्र्य हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा ठिकाणी रिल शूट करणं, नाच करणं योग्य नाही. अशा गोष्टींना प्रतिबंध केलाच पाहिजे. दुसरा युजर म्हणतो मंदिर ही प्रार्थना करण्याची, देवाच्या चरणी लीन होण्याची जागा आहे. रिल शूट करण्यासाठी मिळालेला आयता स्टुडिओ नाही. त्यामुळे या मुलीला रोखलं गेलं तेच योग्य आहे. अशा पद्धतीने रिल शूट करुन आणि नाच करुन तुम्ही मंदिरातलं वातावरण बिघडवत आहात हे करणं योग्य नाही असं तिसऱ्या युजरने म्हटलं आहे. आणखी एक युजर म्हणतो पोलिसाने केलेली कृती १०० टक्के चुकीची आहे. मंदिरात जाऊन लोक नाच करतात त्यात गैर काय? ही मुलगी मंदिराच्या रांगेत होती. तिने गाभाऱ्यात गेल्यावर तर असं काही केलं नाही ना? मग तिला कशाला अडवलं? दुसऱ्याने यावर या युजरला उत्तर दिलं आहे. पोलिसाची काहीही चूक नाही तो त्याचं कर्तव्य करत होता. शिवाय सगळ्या मोकळ्या जागा म्हणजे नाच करण्याचा मंच नाही.

व्हायरल क्लिपनंतर युजर्स सोशल मीडियावर काय प्रश्न विचारत आहेत?

  • मंदिरात मोबाइल फोन नेण्यास संमती कुणी दिली?
  • या मुलीला दंड का ठोठावला नाही?
  • चार धामच्या मंदिरात जसे नियम आहेत तसे सगळ्या मंदिरात का नाहीत?
  • मंदिरातल्या परिसरात नाच करु दिलाच कसा काय?
  • पोलीस येण्याची वाट का बघावी लागली? रांगेतल्या भक्तांनीच मुलीला का अडवलं नाही?