मेट्रोच्या डब्यातल्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. चेन्नईतल्या मेट्रोत एक जाहिरात झळकली आणि त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. यानंतर मेट्रोतल्या या जाहिरातीवरुन डीएमके पक्षाच्या खासदार तमिझाची थांकरापंडियन यांनी कारवाईची मागणी केली आहे. खासदार तमिझाची यांनी या जाहिरातीत स्त्रियांचा अपमान झाला आहे असं म्हणत त्यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

जाहिरातीचा नेमका वाद काय?

मेट्रोतल्या डब्यात एक जाहिरात झळकली. ही जाहिरात FD अर्थात फिक्स्ड डिपॉझिटची आहे. ही जाहिरात एका को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची आहे. THECOS असं या क्रेडिट सोसायटीचं नाव आहे. त्यांनी जाहिरात लक्षवेधी व्हावी म्हणून एक संदेश लिहिला आहे. हा संदेशच वादाचं मूळ ठरला आहे. गर्लफ्रेंड तुमच्यात कदाचित शून्य टक्के इंटरेस्ट घेईल आम्ही मात्र एफडीवर १४ टक्के इंटरेस्ट देतो असं म्हणत ही जाहिरात करण्यात आली. मात्र यावरुनच वाद सुरु झाला आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

DMK कडून जाहिरात हटवण्याची मागणी

DMK ने या जाहिरातीवर आक्षेप घेतला असून ही जाहिरात म्हणजे स्त्रियांचा अपमान आहे तसंच ही जाहिरात मेट्रोतून तातडीने हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. DMK खासदार तमिझाची यांनी या जाहिरातीवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे आणि या जाहिरातीवरील मजकुराचा निषेध नोंदवला आहे. ही जाहिरात मेट्रोच्या डब्यातून तातडीने हटवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. डीएमकेचे खासदार म्हणाले अशा प्रकारच्या जाहिराती करणं हा स्त्रियांचा अपमान आहे. यामुळे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचतो आहे. अशा पद्धतीच्या जाहिराती करुन मिळणारी प्रसिद्धी ही सवंग प्रसिद्धी आहे. अशा जाहिराती सार्वजनिक ठिकाणी झळकतात, ज्यामुळे स्त्रियांच्या समाजातील प्रतिष्ठेला धक्का पोहचतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

AIDMK कडूनही कारवाईची मागणी

AIDMK नेही या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. AIDMK च्या प्रवक्त्या कोवाई सत्यन यांनी म्हटलं आहे की आम्ही सदर क्रेडिट सोसायटीच्या विरोधात स्त्रियांचा अपमान केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि त्यांना नोटीसही धाडणार आहोत. सत्यन म्हणाल्या, लोकांना व्याज दराबाबत सांगताना त्यात स्त्रियांचा अपमान या जाहिरातीत करण्यात आला आहे. ही बाब आम्ही कधीही सहन करणार नाही. जे शब्द जाहिरातीत लिहिण्यात आले आहेत ते वाचून माझी तळपायाची आग मस्तकात गेली आहे. नेमक्या कुठल्या शब्दांत मी याचा निषेध नोंदवला पाहिजे हेच मला आत्ता सुचत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.