नायजेरियास्थित बोको हराम या संघटनेने २०० हून अधिक विद्यार्थिनींचे अपहरण करून धर्माच्या नावाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लाम धर्माचा अभ्यास करावा, असे आवाहन पाकिस्तानची युवा कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिने केले आहे. ‘इस्लाम’ या शब्दाचा खरा अर्थ शांती आहे. हा मुद्दा अपहरणकर्ते विसरून गेले असून ते इस्लामच्या नावाचा गैरवापर करीत आहेत, अशीही टीका मलाला हिने केली.
या अपहरणकर्त्यांनी ना इस्लामचा अभ्यास केला आहे ना कुराणाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम इस्लामचा अभ्यास करावा, असे मत मलाला हिने ‘सीएनएन’ वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले. अपहरणकर्त्यांनी या मुलींना आपल्या बहिणींप्रमाणे वागवावे, असेही आवाहन मलाला हिने केले. बोको हराम या संघटनेने अपहृत मुलींना गुलामगिरीत ढकलून देण्यासाठी त्यांची विक्री करण्याची धमकी दिली आहे. आपल्याच बहिणींना तुरुंगात डांबून ठेवून कोणी त्यांच्याशी असे वाईट वर्तन कसे करू शकतात, अशी विचारणा मलालाने केली. या मुलींचे अपहरण झाल्याचे वृत्त ऐकल्यानंतर आपल्याच बहिणींवर असे संकट कोसळल्याचे जाणवले आणि त्यांच्यासमवेत बोलण्याचीही इच्छा झाली, असेही मलाला म्हणाली.
या मुद्दय़ावर जगाने स्तब्ध राहू नये, असे स्पष्ट आवाहन मलाला हिने ‘बीबीसी’समवेत बोलताना केले. तीन आठवडय़ांपूर्वी ही घटना घडलेली असून, मुलींना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने आणखी काही करण्याची गरज आहे. अशा गोष्टी घडतात, तेव्हा आपण स्वस्थ बसू शकत नाही. आपण असेच गप्प बसलो तर अशा घटना वाढत जातील, असाही इशारा मलालाने दिला.

या अपहरणकर्त्यांनी ना इस्लामचा अभ्यास केला आहे ना कुराणाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम इस्लामचा अभ्यास करावा,