आखाती देशात संघर्ष पेटल्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर होताना पाहायला मिळत आहे. या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या गोंधळाच्या स्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत.
दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही वाढ २०२० पासूनची सर्वात मोठी उसळी ठरली आहे. आखाती देशातील वाढत चाललेला संघर्ष आणि मध्यपूर्वेतील देशांमधून होणारा पुरवठा खंडित होण्याची भीती, या पार्श्वभूमीवर ट्रेडर्स चिंतेत असल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
यादरम्यान सरकारने म्हटले आहे की, पर्यायी मार्गांनी तेलाची आयात ही पूर्ण क्षमतेने सुरू आहे आणि सध्यातरी उर्जेचा पुरवठा हा सुरक्षित आहे. मात्र, असे असले तरी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये ही वाढ दीर्घ काळासाठी कायम राहिली तर याचा ग्राहकांवर परिणाम होऊ शकते असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
तेलाच्या वाढलेल्या किमतींचे पडसाद संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींपासून ते विमानाच्या तिकीटांचे दर वाढताना पाहायला मिळतील, आणि अखेरीच त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो.
पेट्रोल-डिझेल महागणार का?
भारत देशात लागणारे जवळपास ८५ टक्के कच्चे तेल हे आयात करतो, त्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत झालेला बदलांचा लगेच थेट परिणाम देशांतर्गत इंधनाच्या दरांवर होतो
जर दीर्घ काळासाठी कच्च्या तेलाच्या किमती या वाढलेल्याच राहिल्या तर तेल मार्केटिंग कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा किंवा वाढलेले दर स्वतः सहन करण्यासाठी दबाव येऊ शकतो.
कमी कालावधीसाठी जरी इंधनाचे दर बदलले नाहीत तरी दीर्घकाळ तेलाच्या किमती वाढलेल्याच राहिल्या तरीही व्यापक अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा खर्च वाढेल.
विमानांचे तिकीट महाग होणार?
कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा थेट परिणाम विमान वाहतूक सेवांवर होतो. विमान कंपनी चालवत असताना त्यांच्या खर्चाचा एक मोठा भाग हा इंधनावर खर्च केला जातो. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र वाढ होते, तेव्हा एव्हिएशन टर्बाइन फ्युल (ATF) चे दर देखील वाढतात.
यादरम्यान एकीकडे इंधनाचे वाढलेले दर आणि दुसरीकडे भू-राजकीय तणावामुळे हवाई क्षेत्रावर निर्बंध आल्यास विमान मार्ग आणि उड्डाणाच्या वेळेत करावे लागणारे बदल, अशा दुहेरी पेच विमान कंपन्यांना सहन करावा लागू शकते असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे. त्यामुळे तेलाचे दर असेच वाढत राहिले तर विमानाचे तिकीट देखील महाग होऊ शकते.
महागाई वाढण्याचा धोका
तेलाच्या किमतींमधील सततच्या वाढीमुळे महागाईसाठीचा दबाव वाढू शकतो. ऊर्जेचा खर्चाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेतील वाहतूक, उत्पादन आणि लॉजिस्टिकच्या खर्चावर परिणाम होतो. जेव्हा इंधन महाग होते, तेव्हा त्याचा परिणाम अनेकदा इतर वस्तू आणि सेवांवर देखील दिसून येतो. यामुळे एकूण महागाई वाढू शकते.
तेलाच्या किमती का वाढत आहेत?
चॉईस ब्रोकिंगचे कमोडिटी आणि करन्सी अॅनालिस्ट अमीर मकडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
“यूएस डब्लूटीआय कच्चे तेल वाढीसह ९८ डॉलर्सच्या जवळ उघडले आणि सध्या ते ११५ डॉलर्सच्या आसपास ट्रेड करत आहे, ही वाढ जवळपास २६ टक्क्यांची आहे. २०२० नंतरची कच्च्या तेलाच्या किमतीतील ही सर्वात मोठी उसळी आहे, ज्याला प्रामुख्याने मध्यपूर्वेतील अडथळे कारणीभूत ठरले आहेत,” असे मकडा यांनी सांगितले.
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून वाहतूक आडवल्यानंतर पुरवठ्याबाबत चिंता आणखी वाढल्याचेही ते म्हणाले. “इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून कच्च्या तेलाचा पुरवठा बंद केला आहे, ज्यामुळे प्रादेशिक उत्पादनाबद्दलचा तणाव आणखी वाढला आहे,” असे त्यांनी सांगितले.
कुवेत, इराक आणि कतार यासारख्या देशांनी देखील उत्पदानात घट झाल्याचे नमूद केल्याने पुरवठ्याची स्थिती आणखी वाईट झाल्याचे मकडा म्हणाले. दरम्यान देशांतर्गत बाजारात देखील तेलाच्या किमती वाढण्याचा प्रभाव दिसून येत आहे.
तेलाच्या किमती वाढल्याने भारताचे इम्पोर्ट बिल देखील वाढेल, ज्यामुळे परकीय चलन देशाबाहेर बाहेर जाण्याचे प्रमाण वाढेल आणि त्याचा रूपयावर दबाव पडेल.
सध्यातरी सरकारने तेलाचा पुरवठा स्थिर ठेवला आहे. पण विश्लेषकांच्या मते, जर संघर्ष अधिक काळ वाढला आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढतच राहिल्या तर याचा परिणाम हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर जाणवेल, म्हणजेच शेवटी तो ग्राहकांपर्यंत देखील पोहचेल.
