फुलाला सुंगध मातीचा असे आपण म्हणतो पण त्यात हवामानाचाही बराच मोठा संबंध असतो. जागतिक हवामान बदलांमुळे आता फुलांचा वासही बदलू लागला आहे. त्यात पूर्वीची विविधता व आकर्षकता राहिलेली नाही असे संशोधकांचे मत आहे.
फुले कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुवास निर्माण करतात त्यातून परागीभवनातून झाडांची पुढची पिढी तयार होत असते, म्हणजे सपुष्प वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलांच्या सुवासाचा मोठा वाटा असतो. फुलांचा सुवास जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्या वनस्पतीतील असंख्य जैवरासायनिक घटक एकत्र काम करीत असतात. हे घटक अस्थिर असतात. तापमान वाढले तर त्याचा परिणाम फुलांच्या सुवासावर होतो हे वैज्ञानिकांना माहिती आहे, पण ते सिद्ध करता आले नव्हते. फुलांच्या सुवासात हवामान बदलांनी फरक पडून त्याचा त्यांच्या पुनरुत्पादनावर तसेच वाढीवर वाईट परिणाम होत असतो. जेरूसलेममधील हिब्रू विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले असून आजूबाजूचे तापमान वाढले तर त्यामुळे फुलांचा सुवास कमी होतो म्हणजेच तो तयार करणारी जैविक रसायने कमी तयार होतात. तापमान वाढले की, त्याचा संबंध जागतिक हवामान बदलांशी असतो हे उघडच आहे. वनस्पती व परागीकारक यांच्या संबंधात त्यामुळे बाधा येते कारण फुलांचा रंग व सुवास यावरच कीटक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. तापमान वाढीने जर फुलांच्या सुवासावर परिणाम झाला तर कीटक फुलांकडे फिरकत नाहीत, असे जेरूसलेम विद्यीपाठाचे संशोधक अ‍ॅलन कॅनानी यांनी सांगितले. वनस्पतींमध्ये सुवास निर्माण करणाऱ्या यंत्रणेचे नियंत्रण करून त्यांनी सुवास निर्माण करणाऱ्या रसायनांवर नियंत्रण आणले. त्यामुळे त्यांना हा सुवास वाढवण्यासाठी आवश्यक असलेली रसायने कुठली हे समजले, त्यातून त्यांनी फुलातील सुवास कमी होणार नाही याची दक्षता घेणारी यंत्रणा तयार केली. पेटुनिया वनस्पती जर जास्त तापमानाला वाढवल्या गेल्या तर त्यांच्या उत्पादनात नक्की फरक पडतो कारण वाढत्या तापमानामुळे त्यांचा सुवास कमी होत असतो. तापमान वाढल्याने फेनिलप्रोपॅनॉइडचे प्रमाण कमी होते व त्यामुले पेटुनियाच्या पी ७२० व ब्लू स्पार्क या दोन प्रजातीत सुवास कमी होतो. त्यामुळे जैवसंश्लेषण करणाऱ्या प्रथिनांचे आविष्करण कमी होतो, त्यांची क्रियाशीलता कमी होते. कॅननी यांनी हा दुष्परिणाम टाळण्यासाठी अराबीडोपसिस थालियाना पीएपी १ जनुकाचे आविष्करण वाढवले त्यामुळे आजूबाजूचे तापमान काहीही असले तरी सुवास निर्माण करणाऱ्या रसायनांवर त्याचा काही परिणाम होत नाही. सुवास बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेतील पीएच १४ हा जनुक थेट नियंत्रक असतो. त्याचे आविष्करण हातात आले तर पेटुनियाच्या फुलांचा वास येत नाही पण सुवासासाठी लागणारे रसायन त्यात तयार होत असते. हे जनुक सपुष्प वनस्पतींच्या दोन प्रजातीत रंग व सुवास यांच्यातील कळ म्हणून काम करते. जर्नल प्लांट सेल अँड एनव्हरॉन्मेंट या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.