मुंबई : वाढते तापमान हे फक्त हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींपुरते मर्यादित राहिले नाही. वाढत्या तापमानामुळे जगभरात आरोग्याची समस्या अत्यंत उग्र होईल. लोकांच्या कार्यक्षमेतवर परिणाम होईल. वाढते तापमान आणि संबंधित घटनांमुळे २०५० पर्यंत प्रति वर्षी सात लाख लोकांचा मृत्यू होईल, परिणाम एक मोठी आर्थिक समस्या निर्माण होईल, असा गंभीर इशारा द लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकातील शोधनिंबधातून देण्यात आला आहे.

अर्जेंटिनातील पॉन्टिफिया युनिव्हर्सिडाड कॅटोलिका, या विद्यापीठातील मानव विकास केंद्रातील प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनात वरील माहिती समोर आली आहे. संशोधकांनी १५६ देशांतील २००० ते २०२२ या काळातील आकडेवारींचा अभ्यास करून पुढील निष्कर्ष नोंदविले आहेत.

मागील काही वर्षांपासून जागतिक तापमान वाढीचा कल आहे. वाढत्या तापमानाचा कल काय राहील. २०५० पर्यंत जगभरात तापमान वाढ आणि तापमान वाढीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी सात लाख लोकांचा मृत्यू होईल. २०२२ च्या तुलनेत तापमान वाढ आणि संबंधित नैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणात सात ते अकरा टक्क्यांनी वाढ होईल.

तापमान वाढीमुळे लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. त्यामुळे मधुमेह, स्थुलपणा सारख्या आजारांमध्ये वाढ होईल. लहान मुलांना घराबाहेर खेळता येणार नाही. खेळाच्या वेळेवर मर्यादा येईल. शेती, कार्यलयांमध्ये काम करणाऱ्या लोकांना थकवा जास्त जाणवेल. तापमानामुळे लोकं घराबाहेर पडणार नाहीत, घरांमध्ये बसून राहण्याला पसंती देतील. लोकांची काम करण्याची क्षमता कमी होईल. लोकांची काम करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे दरवर्षी सुमारे ३६८ कोटी डॉलरचे नुकसान होईल.त्याचा सर्वात वाईट परिणाम विकसनशील देशांवर पडेल. जगातील सर्व देशांनी शहरांमध्ये तातडीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली नाही तर तापमान वाढीच्या परिणामांपासून सुटका नाही, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे.

भारताला तापमान वाढीचा जास्त फटका

सरासरी तापमान २७.८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. मध्य अमेरिका, आणि दक्षिण अमेरिकेतील देश, पूर्व आफ्रिकेतील देश, दक्षिण आशियातील देशांना या तापमान वाढीचा जास्त फटका बसेल. सरासरी २७.८ अंश सेल्सिअस तापमान वाढीनंतर कार्यक्षमतेत मोठी घट होईल. भारताच्या बाबत विचार करता, उष्णकटिबंधीय आणि मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे तापमान वाढीचा फटका जास्त बसेल. जीवनशैलीवर परिणाम होऊन आजारांचे प्रमाण वाढेल. विकसनशील देशांना जास्त फटका बसेल, अशा देशांतील लोकसंख्या सुमारे ५४.८ टक्के आहे.

२०३० पर्यंत सरासरी कामाच्या तासात २.२ टक्क्यांनी घट

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनेही तापमान वाढीकडे लक्ष वेधले असून, वाढत्या तापमानामुळे २०३० पर्यंत जगभरातील कामाच्या तासात सरासरी २.२ टक्क्यांनी घट होईल. हे नुकसान सुमारे आठ कोटी लोकांचे पूर्णवेळ काम गेल्याइतके असेल. कृषी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होईल. मजुरांची मोकळ्या आकाशाखाली काम करण्याची क्षमता कमी होईल. त्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेचे २,४०० अब्ज डॉलरचे नुकसान होईल. परिणाम दक्षिण आशिया आणि पश्चिम आफ्रिकी देशातील स्थिती अधिक गंभीर होईल. या ठिकाणी कामाच्या तासांत पाच टक्क्यांनी घट होईल.

या उपाययोजनांची गरज

– शहरांमध्ये वेगाने वृक्ष लागवड करण्याची गरज
– स्वस्त बंधिस्त व्यायाम शाळांची निर्मिती करावी लागेल
– हरितगृह वायूचे उत्सर्जन वेगाने कमी करावे लागेल