भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशमधील नेत्यांनी पत्रकारांना तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिलाय. पत्रकारांनी महागाई आणि इंधनदरवाढीबद्दल प्रश्न विचारला असता भाजपाच्या नेत्याने ही प्रतिक्रिया दिली. येथील कांती जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख रामरतन पायल यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. करोनाची तिसरी लाट येण्याची भीती असतानाच पत्रकार इंधनदराबद्दल प्रश्न विचारत असल्याचा राग पायल यांनी व्यक्त केला.

पायल हे एका बैठकीसाठी आले असता त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नव्हते किंवा अनेकांनी मास्कही घातले नव्हते. अशा परिस्थितीमध्येच स्थानिक पत्रकाराने पायल यांना एक प्रश्न विचारला. मात्र त्यावर पायल हे प्रचंड संतापले. “तुम्ही ते (इंधन) तालिबानकडून घ्या. अफगाणिस्तानमध्ये पेट्रोल ५० रुपये प्रती लिटर आहे. मात्र तिथे कोणी वापरण्यासाठी नाहीय. इथे आपल्याला किमान सुरक्षित तरी वाटतंय,” असं पायल यांनी रागाच्या भरात म्हटलं. पायल यांनी पुढे बोलताना, “करोनाची तिसरी लाट देशामध्ये येण्याची भीती असताना तुम्ही पेट्रोलबद्दल बोलताय. देश कोणत्या संकटामधून जात आहे तुम्हाला दिसत नाहीय का?.” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

भारतामधील पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरच्या वर गेले आहेत तर डिझेलचे दर ९० रुपये प्रती लिटरहून अधिक पर्यंत पोहचले आहेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये इंधनाच्या दरांवरुन विरोधकांनी बराच गदारोळ गेला. देशभरामध्ये विरोधकांनी इंधनदरवाढीसंदर्भात आंदोलनही केल्याचं पहायला मिळालं आहे. असं असतानाच पायल यांनी हा सल्ला दिल्याने संताप व्यक्त केला जातोय. मात्र असा सल्ला देणारे पायल हे भाजपाचे पाहिलेच नेते नाहीत. यापूर्वी बिहारमधील भाजपा नेते हरिभूषण ठाकूर यांनी भारतात भीती वाटत असेल अफगाणिस्तानमध्ये निघून जाण्याचा सल्ला दिला होता. तिथे इंधनाचे दर कमी आहेत असंही ठाकूर म्हणाले होते.