Goa Parasailing Accident Viral Video: गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. पॅरासेलिंग करत असताना दोरखंड तुटल्याने पर्यटक थेट समुद्रात कोसळला. बचाव पथकाने तत्काळ पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. समुद्रात बोटीला दोरखंड बाधून पॅरासेलिंग केले जाते. दोरखंडाच्या मदतीने पर्यटक हवेत झेपावला पण, दोरखंड तुटल्याने तो समुद्रात कोसळला. गोव्यातील प्रसिद्ध बागा समुद्रकिनारी सोमवारी ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, गोव्यात समुद्रकिनारी विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स होत असतात. पॅरासेलिंग देखील वॉटर स्पोट्सचाच एक प्रकार आहे. यात समुद्रात बोटीला दोरखंड बाधून पॅरासेलिंग केले जाते. सोमवारी प्रसिद्ध बागा समुद्रकिनाऱ्यावर एक पर्यटक पॅरासेलिंग करत असतान समुद्रात कोसळला. पर्यटक हवेत असताना खोल समुद्रात कोसळल्याने सर्वत्र आरडाओरड सुरु झाल्यानंतर बचाव पथक त्याच्या मदतीला धावले.
मोठा अनर्थ टळला
बोटीवरील क्रू सदस्य आणि बचाव पथकांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेत पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दुर्घटनेमुळे राज्यातील वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटकांची सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, गोवा पोलिस आणि पर्यटन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, घटनेची चौकशी केली जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न
गोव्यातील समुद्रकिनारी विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स घेतले जातात. ऐन पर्यटन हंगामात समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी देश -विदेशातील पर्यटक गर्दी करत असतात. दरम्यान, अशा अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या वर्षी पॅराग्लायडिंगमध्ये दोघांचा मृत्यू
गेल्यावर्षी गोव्यात पॅराग्लायडिंगमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. उत्तर गोव्यातील केरी समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूट खाली कोसळून पुण्याच्या २७ वर्षीय शिवानी दाबळे आणि नेपाळी मार्गदर्शक सुमल नेपाली (२६) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गोव्यात पर्यटन विभागाने पॅराग्लायडिंगवर तात्पुरती बंदी घातली होती.
