Goa BJP Minister  Atanasio ‘Babush’ Monserrate acquitted in rape case: गोव्याचे महसूल मंत्री आणि पणजीचे भाजपा आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१६ मधील बहुचर्चित या प्रकरणाचा दहा वर्षानंतर निकाल लागला आहे. मेरशी येथील विशेष न्यायालयाने आज (११ फेब्रुवार) हा निर्णय दिला. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने मंत्री मोन्सेरात आणि सहआरोपी रोझारिया फेरोस याचीही निर्दोष मुक्तता केली.

तरुणीच्या जबानीत विसंगती

बचाव पक्षाचे वकील दामोदर धोंड यांनी या निकालानंतर माहिती देताना तक्रारदार तरुणीने सहावेळी जबानी बदलून परस्परविरोधी विधाने केल्याचे सांगितले. “मोन्सेरात यांच्या घरी आल्यानंतर तिला काहीतरी खायला आणि प्यायला देण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर नसताना तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला होता”, असे धोंड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“पण, तरुणीला हा प्रसंग केव्हा घडला तो दिवस सांगता आला नाही. तिने मार्च ते एप्रिल असा ६१ दिवसांचा कालावधी सांगितला. तिचे दोन महिन्याचे मोबाईल रेकॉर्ड तपासण्यात आले. तरुणीने शुद्धीवर नसताना तिने केलेले आणि आलेले फोन कॉल, मेसेज याबाबत पोलिसांना काहीच माहिती मिळाली नाही”, असे धोंड यांनी सांगितले. तरुणीने वारंवार जबानी बदलली, असे धोंड यांनी सांगितले.

२०१६ साली दाखल झाली होती तक्रार

बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. आईसोबत मुलीचा व्यवहार करुन लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्याविरोधात आरोप होता. मोन्सेरात यांच्यासह रोझारिया फेरोस याला देखील सहआरोपी करण्यात आले होते. मोन्सेरात यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता ३७६ (बलात्कार), ३७० अ (मानव तस्करी), ३२८, ३२४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वयाचा मुद्दा न्यायालयात टिकला नाही

मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी ती अल्पवयीन होती असा दावा करण्यात आला होता. पण, मुलीचे वय सिद्ध करण्यासाठी आवश्यक शाळेचा दाखला किंवा इतर कागदपत्र सादर करता न आल्याने वयाचा मुद्दा न्यायालयासमोर टिकला नाही. न्यायालयाने बलात्कारासह लैंगिक अत्याचार आणि धमकीचे आरोपही फेटाळून लावले.

न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास – मंत्री मोन्सेरात

“देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्याविरोधात करण्यात आलेल्या सर्व आरोपातून न्यायालयाने माझी मुक्तता केली आहे. निकालासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. मी आणि माझ्या कुटुंबाने गेल्या दहा वर्षात काय सहन केलंय हे आम्हालाच ठाऊक आहे. या कठीण काळात सोबत राहिलेल्या कुटुंब, सहकारी आणि मित्रांचे मी आभार मानतो”, असे या निकालानंतर मंत्री बाबूश मोन्सेरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.