Goa club fire Luthra brothers likely to be brought back next week as India : गोव्यातील क्लब ‘बर्च बाय रोमियो लेन’मध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गोव्यासह संपूर्ण देश हादरल्याचे पाहायला मिळाले. मात्र या घटनेनंतर या क्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हे दोघे भाऊ थायलंड येथे पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
मात्र हे दोघे पुढील आठवड्यात भारतात परत येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे त्यांना भारतात घेऊन येण्यासाठीच्या कायदेशीर औपचारिकता या काळजीपूर्वक आणि वेळ घेऊन केल्या जातात आणि विकेंडला सरकारी कामाची गती मंदावते, असे अधिकार्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “बँकॉक येथील भारतीय दूतावास सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांच्या संबंधित प्रकरणात थाई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.”
“दूतावासाने केलेल्या हस्तक्षेपानंतर दोघांना फुकेत येथील थाई अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. थाई अधिकारी सध्या स्थानिक कायद्यांनुसार करावाई करत आहेत, ज्यामध्ये दोघांना भारतात परत पाठवण्याचाही समावेश आहे.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसा, प्रक्रियेचा भाग म्हणून दोघा भावांना फुकेत येथून बँकॉक येथील इमिग्रेशन डिव्हिडन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. या दोघांना बँकॉक येथे एमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेट जारी केले जाईल आणि औपचारिकता आणि पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर डिपोर्टेशनची प्रक्रिया वेगाने केली जाईल.
तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबमध्ये आग लागल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या आत या दोन भावांनी थायलंडचे तिकिट बुक केले होते.
गेल्या चार दिवसांपासून ते फुकेत येथे होते. हे दोघे एका हॉटेलमध्ये राहात होते आणि जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होत. कायदेशीर औपचारिकतांमुळे त्यांना भारतात घेऊन येण्यासाठी तीन-चार दिवस लागतील. ते थायलंड पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्या दोघांना पहिल्यांदा बँकॉक येथे हलवले जाईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
