Goa Health Minister Vishwajit Rane : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका डॉक्टरांचं तडकाफडकी निलंबन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आरोग्यमंत्री राणे यांनी डॉक्टरांना चांरलंच सुनावलं होतं. तसेच संबंधित डॉक्टर रुग्णांशी उद्धटपणे बोलल्याचा आरोप करत तात्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले होते. या घडामोडींनंतर विरोधकांनी गोवा सरकारवर जोरदार टीका केली होती.

यानंतर अखेर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा आदेश रद्द करत संबंधित डॉक्टरांचं निलंबन होणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका वरिष्ठ डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (८ जून) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत त्या वरिष्ठ डॉक्टरांचं निलंबन होणार नसल्याचं सांगत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा आदेश रद्द केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ डॉक्टरांना निलंबित करण्याचे आदेश गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याव्हिडीओमध्ये असं दिसतं होतं की, आरोग्यमंत्री राणे यांनी शनिवारी एका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी एका वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आणि रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर आरोग्यमंत्री डॉक्टरांवर चांगलेच संतापले.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री संबंधित वरिष्ठ डॉक्टरांना म्हणाले की, “रुग्णांशी कसं वागायचं हे शिकून घ्या. तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका. तुम्ही डॉक्टर आहात ना? कितीही भार असला तरी तुम्हाला रुग्णांबरोबर गैरवर्तन करता येणार नाही”, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच डॉक्टरांना उद्देशून असंही म्हटलं की, “त्यांच्या जागी दुसऱ्या सीएमओची नियुक्ती करा. मी त्यांच्या निलंबनाच्या फाईलवर सही करेन. मला त्यांना ताबडतोब निलंबित करायचं आहे. मी सहसा उद्धटपणे वागत नाही, पण मी हे आता सहन करू शकत नाही”, असं म्हणत आरोग्यमंत्री राणे यांनी संबंधित डॉक्टरांची तात्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले होते.

काँग्रेसने केली होती टीका

आरोग्यमंत्री राणे यांच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली होती. काँग्रेसने म्हटलं होतं की, “गोव्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम करण्यास हे मंत्री खरोखरच योग्य आहेत का? त्यांच्या वर्तनामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर जबाबदारीने देखरेख करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये विश्वजित राणे यांनी एका वरिष्ठ डॉक्टरांचा कॅमेऱ्यासमोर सार्वजनिकरित्या अपमान करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आणि अहंकार आणि हुकूमशाहीचे लाजिरवाणे प्रदर्शन आहे. मानवतेच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणारे डॉक्टर असा आपमान नाही तर सन्मानास पात्र आहेत”, असं गोवा काँग्रेसने म्हटलं होतं.