रस्त्याच्या कडेला कचरा फेकल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि पोलिसांनी नोटीस बजावल्याने, गोव्यातील एका २२ वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

मृत तरुण हा उत्तर गोव्यातील म्हापसा येथील रहिवासी होता आणि पदवीचे शिक्षण घेत होता. गुरूवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक स्थानिक नागरिक या विद्यार्थ्याला रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यावरून जाब विचारताना आणि वाद घालताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. तक्रारीची दखल घेत म्हापसा पोलिसांनी ‘गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल कायद्यांतर्गत’ गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी या तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावले होते.

पोलीस ठाण्यातील चौकशी आणि नोटीस

म्हापसा उपविभागीय पोलीस अधिकारी सलीम शेख यांनी सांगितले की, “व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही कायद्यानुसार गुन्हा नोंदवला होता. या कायद्यानुसार बहुतांश वेळा दंड आकारला जातो, तर काही प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार कारावासाचीही तरतूद आहे. आम्ही त्या तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली, त्याला नोटीस दिली आणि घरी सोडून दिले.” पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी त्या तरुणाला आणले गेले, तेव्हा पोलीस ठाण्यात इतरही अनेक खटल्यांची गर्दी होती. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला आणि त्याच्याशी चर्चा करायला पोलिसांना थोडा जास्त वेळ लागला.

घरातच संपवले जीवन

पोलीस ठाण्यातून घरी परतल्यानंतर, गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास या तरुणाने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. सोशल मीडियावरील बदनामी आणि पोलीस कारवाईच्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

चौकशीचे आदेश

या घटनेमुळे गोव्यात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावरील ‘ट्रॉलिंग’ आणि मानसिक दबावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, तरुणाच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. तरुण मुलाकडे बंदूक कुठून आली आणि मृत्यूच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.