या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी सोमवारी राज्य विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही असे म्हटले आहे. लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. फालेरो यांनी यापूर्वी ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांशी बोलतान त्यांनी मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल काँग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा असे म्हटले होते.

त्यानंतर आता फालेरो लवकरच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. गोव्याला विश्वासार्ह पर्यायाची गरज असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर फालेरो यांचे काँग्रेस सोडून जाणे आणि गोवा निवडणुकीत तृणमूलने प्रवेश करण्याची शक्यता असल्याने राज्यात नवीन राजकीय समीकरणे तयार होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात फालेरो यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. पत्रामध्ये त्यांनी काँग्रेससोबतच्या ४० वर्षाच्या प्रवासाबाबत आठवणी जागवल्या आहेत. त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला. पत्रात फालेरो यांनी गोवा काँग्रेसवरही प्रश्न उपस्थित केले. पक्षातील भांडणांवर प्रश्न विचारत, मला पक्षाने वारंवार निराश केले आहे असे फालेरो यांनी म्हटले आहे.

“२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. आम्हाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता, पण आमच्या मतभेदांमुळे भाजपाला बहुमत सिद्ध करता आले आणि आम्ही जनतेला निराश केले. या साडेचार वर्षांत मी पक्षाला एकत्र आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी हायकमांडचे दुर्लक्ष झाले,” असे फालेरो यांनी म्हटले आहे.

“आतापर्यंत आमच्या १३ आमदारांच्या पराभवाला कोणालाही जबाबदार धरले गेले नाही. ज्यांच्यासाठी आम्ही बलिदान दिले आणि लढलो असा काँग्रेस पक्ष आता गोव्यात राहिला नाही. आताचे लोक संस्थापकांच्या प्रत्येक आदर्श आणि तत्त्वाच्या विरोधात काम करत आहेत, असे फालेरो यांनी म्हटले.

काँग्रेस पक्ष आपल्या गोवा युनिटसाठी निष्काळजी झाला आहे असेही ते म्हणाले. “नेत्यांचा एक गट लोकांचा विचार करण्यापेक्षा आणि त्यांचे भले करण्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक फायद्यांना प्राधान्य देत आहे. एकूणच आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे म्हणूनच मला पक्षाची पडझड रोखण्यासाठी आणि चांगल्यासाठी बदल करण्याची कोणतीही आशा किंवा इच्छाशक्ती दिसत नाही,” असे फालेरो यांनी म्हटले आहे. फालेरो यांनी आपल्या पत्रात इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचाही उल्लेख केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa congress leader luizinho faleiro letter to sonia gandhi after quitting party abn
First published on: 28-09-2021 at 08:08 IST