२०२२ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात नोकरी आणि बेरोजगारीबाबत सात मोठ्या घोषणा केल्या आहेत. मंगळवारी (२१ सप्टेंबर) अरविंद केजरीवाल यांनी असं गोव्यातील जनतेला असं वचन दिलं आहे की, “राज्यात जर ‘आप’चं  सरकार सत्तेत आलं तर तर भ्रष्टाचार थांबेल.” त्याचबरोबर, यावेळी केजरीवाल यांनी तरुणांना रोजगाराबाबत देखील मोठी आश्वासनं दिली आहे. “आप राज्यातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून देईल. प्रत्येक घरातील एका बेरोजगार व्यक्तीला शासकीय नोकरी मिळेल आणि कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना ३ हजार रुपये भत्ता मिळेल”, अशी घोषणा केजरीवाल यांनी दिली आहे. 

विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल असंही म्हणाले की, “राज्यातील ८० टक्के नोकऱ्या गोव्यातील रहिवाशांसाठी राखीव असतील.” आम आदमी पार्टीने केलेल्या ट्विटनुसार, गोव्यासाठी पक्षाने मोठ्या घोषणा केल्या आहेत. पर्यटन क्षेत्रात करोनामुळे बेरोजगार झालेल्यांना दरमहा पाच हजार रुपये आणि खाणीचं काम थांबल्याने बाधित झालेल्या लोकांना दरमहा पाच हजार रुपये दिले जातील. ‘आप’चं सरकार सत्तेत आल्यास कौशल्य विद्यापीठ सुरू करेल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.


सरकारी नोकऱ्या भरपूर पैसे असलेल्यांचं मिळतात! ‘आप’चा आरोप

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी (२० सप्टेंबर) गोव्यात तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत, येथील स्थानिक लोकांशी या विषयावर चर्चा करण्यासाठी अरविंद केजरीवाल राज्याला भेट देणार आहेत. ‘आप’ने असाही दावा केला होता की, सरकारी नोकऱ्या या फक्त भरपूर पैसे असलेल्यांना आणि संपर्कांच्या-ओळखीच्या आधारावर मिळते. केजरीवाल यांनी ट्विट केलं होतं की, “गोव्यातील तरुणांना बेरोजगारीच्या कहरामुळे नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारी नोकऱ्या फक्त पैसे असलेल्यांना आणि संपर्कांच्या-ओळखीच्या आधारावर उपलब्ध आहेत.”

गोव्यात ‘आप’ची बेरोजगारीविरोधात मोहीम

महिन्याच्या सुरुवातीला ‘आप’ने गोव्यात बेरोजगारीच्या समस्येविरोधात मोहीम सुरू केली आहे. तुम्हाला नोकऱ्या देण्यात अपयशी ठरलेल्या पक्षांना मत देऊ नका असं देखील यावेळी केजरीवाल यांनी सांगितलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात आप आपले उमेदवार उभे करणार आहे. त्याचदृष्टीने पक्षाकडून राज्यात तयारीला सुरुवात झाली आहे.