Goa CM Pramod Sawant: गोवा म्हटले की, एक वेगळेच जग नजरेसमोर उभे राहते. पण आता गोव्याचे स्वरुप बदलत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच याची कबुली दिली आहे. गोवा आता भोग भूमी (मजा, मस्ती) राहिली नसू ती योग भूमी आणि गोमाता भूमी झाली आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. सुंदर समुद्रकिनारा लाभलेले गोवा आता ‘सन, सँड आणि सी’ या पलीकडे जाऊन मंदिरे आणि संस्कृतीसाठी ओळखले जाऊ लागले आहे, असेही ते म्हणाले.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी गोव्याच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. “पूर्वी जेव्हा जेव्हा लोक गोव्याला यायचे तेव्हा त्यांना गोवा ही फक्त मजा मारण्याची (भोग भूमी) जागा आहे, असे वाटत असे. पण ही भोग भूमी नाही, तर ही योग भूमी आणि गोमाता भूमी आहे. इथेच सनातन संस्थेचा आश्रमदेखील आहे”, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
भगवान विष्णूचा अवतार भगवान परशुराम यांच्या आख्यायिकेचा आधार घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा ही परशुरामाची भूमी आहे. सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात बोलत असताना सावंत यांनी आपले विचार मांडले.
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, राज्यातील स्वच्छ आणि सुंदर मंदिरे हे समुद्रकिनाऱ्यापेक्षा अधिक लोकांना आकर्षित करत आहेत. पूर्वी लोक ‘सन, सँड आणि सी’ पाहण्यासाठी गोव्यात येत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आपली समृद्ध संस्कृती आणि भव्य मंदिरे पाहण्यासाठीही पर्यटक आता येत आहेत.