पीटीआय, पणजी / नवी दिल्ली

गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण आगीप्रकरणी दिल्ली न्यायालयाने ३६ तासांच्या ट्रान्झिट रिमांडची विनंती मान्य केल्यानंतर गोवा पोलिसांनी बुधवारी वादग्रस्त ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाइट क्लबमधील भागीदार अजय गुप्ता याला ताब्यात घेतले.

उत्तर गोव्यात असलेल्या क्लबमध्ये गुंतवणूकदार आणि केवळ भागीदार असल्याचा दावा करणाऱ्या गुप्ता याला गोवा पोलिसांच्या विनंतीवरून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद जोशी यांच्यासमोर हजर करण्यात आले.

दिल्लीमध्ये लूकआउट सर्क्युलर जारी केल्यानंतर गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या गुप्ता याला गोव्यात हलवताना योग्य वैद्याकीय सेवा आणि वेळेवर औषधे मिळावीत याची खात्री करण्याचे निर्देश न्यायाधीशांनी अधिकाऱ्यांना दिले.

नववर्षापूर्वी सुरक्षा मोहीम

दरम्यान पणजीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ख्रिासमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी मोठी सुरक्षा मोहीम राबवण्याची घोषणा केली. ६ डिसेंबरच्या घटनेनंतर पोलीस, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने स्थापन केलेल्या अग्निसुरक्षा लेखापरीक्षण समितीने विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे आणि तपासणीनंतर त्यांचा अहवाल सादर केला जाईल. जर समितीला असे आढळून आले की, या स्थळांनी अग्निसुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही, तर त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा त्यांनी दिला.

लुथ्रा बंधूंना दिलासा देण्यास नकार

दरम्यान, आगीनंतर काही तासांतच थायलंडला पळून गेलेले फरार मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांना दिल्ली कोर्टाकडून अटकपूर्व जामिनासाठी कोणताही अंतरिम दिलासा मिळाला नाही. आरोपी भावांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना यांनी गोवा पोलिसांकडून उत्तर मागितले आणि पुढील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली. थायलंडहून दिल्लीला परतल्यावर त्यांना ताबडतोब अटक होऊ नये म्हणून या भावांनी चार आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मागितला असून त्यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षणदेखील मागितले आहे.