Goa Nightclub Fire Case: गोव्यात नाईट क्लब आग प्रकरणातील क्लबचे मालक लुथरा बंधूंना स्थानिक म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. ०६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अटकेत असणारे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना अखेर जामीन देण्यात आला आहे.
आगीत २५ जणांचा मृत्यू
उत्तर गोव्यातील हडफडे येथे असलेल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला ०६ डिसेंबर २०२५ रोजी आग लागली. यात २५ पर्यटक, क्लबमधील कर्मचारी यांचा मृत्यू झाला होता. क्लबला आग लागली त्यावेळी मालक लुथरा बंधू थायलंडला निघाले होते. दरम्यान, थायलंडमध्ये त्यांना अटक करुन पुन्हा भारतात पाठविण्यात आले. तेव्हापासून लुथरा बंधू अटकेत आहेत. आज अखेर त्यांना म्हापसा न्यायालयाने जामीन मंजूर केला.
शुक्रवारी फेटाळला होता अंतरिम जामीन
बनावट कागदपत्र आणि फसवणुकीच्या प्रकरणात गेल्या शुक्रवारी न्यायालयाने लुथरा बंधूंचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. आरोग्य विभागाकडून बनावट कागदपत्र सादर करून त्यांनी नाईटक्लब चालविण्यासाठी परवाने घेतले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. याच्याशी निगडीत आणखी एक गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल आहे.
डिसेंबरमध्ये घडली होती घटना
बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याने गोव्यासह देशात ही घटना चांगलीच चर्चेत आली होती. यासह गोव्यातील अवैध पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या क्लबचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. नवीन वर्षाच्या तोंडावर ही घटना घडल्याने गोव्याच्या पर्यटनावर देखील याचा काही प्रमाणात परिणाम दिसून आला होता.
