गोव्यात हडफडे येथे ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी नाईटक्लबच्या मालकांना थायलंडमधून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने मोठी कारवाई केली असून, नाईटक्लबच्या अवैध संचालनाप्रकरणी, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ११ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
२५ जणांच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल
हडफडे येथे ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबला ६ डिसेंबर २०२५ रोजी भीषण आग लागली होती. यात २५ पर्यटक आणि कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हणजूणे आणि म्हापसा पोलिसांनी सौरभ लुथरा आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. दाखल गुन्ह्याचा केवळ आगीच्या दुर्घटनेशीच संबंध नाही, तर बनावट कागदपत्रांशी देखील संबंधित आहे. यात नाईटक्लबसाठी अवैध पद्धतीने परवाने मिळवणे आणि बनावट आणि खोटी ना हरकत प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
बेकायदेशीरपण सुरु होता कारभार
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत केलेल्या तपासात नाईटक्लब ना हरकत प्रमाणपत्रासह आवश्यक परवानगी न घेता चालवला जात होता. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईटक्लबच्या भागीदारांनी परवाने मिळवण्यासाठी आणि बेकायदेशीर आस्थापनाला कायदेशीर भासवण्यासाठी कथितरित्या बनावट आरोग्य ना हरकत प्रमाणपत्र आणि खोटे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. नाईटक्लबचा व्यापारी परवाना ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त झाला होता आणि त्यानंतर त्याचे पुन्हा कधीही नूतनीकरण करण्यात आले नाही, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.
यापूर्वीही कारवाई
नाईटक्लबने २०२३-२४ ते २०२५-२६ (६ डिसेंबर २०२५ पर्यंत) आर्थिक वर्षात अंदाजे ३० कोटी रुपयांचा एकूण नफा मिळवला आहे. हा पैसा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यातून मिळालेला पैसा असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. यापूर्वी, ईडीकडून गुन्हेगारी स्वरूपाचे दस्तऐवज, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली असून, अंदाजे ५९ लाख रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या प्रकरणात सुमारे १७ कोटी रुपयांचा तात्पुरता जप्ती आदेश देखील यापूर्वी जारी करण्यात आला होता.
