बलात्कार झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही

अत्तर विशेषज्ज्ञ मोनिका घुर्डे हत्याप्रकरणी गोवा पोलिसांनी बंगळुरूतून एकाला अटक केली. राजकुमार सिंग असे त्याचे नाव असून, तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मोनिकाची छत्री चोरल्याने त्याला कामावरून काढले होते.

राजकुमार हा मूळचा पंजाबचा असून, बंगळुरू पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. राजकुमारच्या एटीएम व्यवहारांमुळे त्याच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील त्याच्या प्रवासावर लक्ष ठेवत पोलिसांनी पाळत ठेवली होती. मोनिका यांच्या हत्येनंतर आरोपीने तिचे एटीएम कार्ड आणि मोबाइल फोनसह पोबारा केला. राजकुमारने कर्नाटकात जाण्याआधी मोनिका यांच्या एटीएम कार्डद्वारे महाराष्ट्रातील मिरज, नाशिकमधील एटीएममधून पैसे काढले होते. त्याआधारे गोवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गोव्यातील सांगोळदा गावाजवळील घरात ६ ऑक्टोबरला मोनिका घुर्डे यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला होता. पतीपासून विभक्त झाल्यानंतर मोनिका एकटय़ाच या घरात भाडय़ाने राहत होत्या.  मोनिका यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट दिसत असले तरी त्यांच्यावर बलात्कार झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोनिका यांचे मुंबईस्थित भाऊ आनंद यांच्याशी ५ ऑक्टोबरला शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता. या प्रकरणी राजकुमार याला अटक करण्यात आली असली तरी गुन्ह्य़ाचा उलगडा होण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.