लॉकडाउनचा असाही परिणाम, गोव्यातले ड्रग्ज पेडलर्स विकतायत भाजी

काही लोकं गाड्या धुवत करतायत गुजराण

प्रतिनिधिक छायाचित्र
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाउन केलं होतं. या लॉकडाउन काळात अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे, कित्येकांना आपल्या नोकऱ्या व रोजगार गमवावा लागला. गोव्यात ड्रग पेडलर्सनाही या लॉकडाउनचा फटका बसला आहे. गोव्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांना अवैध पद्धतीने अमली पदार्थ पुरवण्याचं काम ही मंडळी करत असतात. मात्र लॉकडाउन काळात कडेकोट बंदोबस्तामुळे या पेडलर्सवर भाजी विकण्याची वेळ आली आहे. काही जण गाड्या धुवत आपला चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मापुसा येखील ड्रग्ज ट्रिटमेंट सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. रविंद्र पाटील यांनी आपला अनुभव सांगितला. “अनेक ड्रग पेडलर्सनी या काळात भाजी, फळं विकणं सुरु केलं आहे. काही जणं तर चक्क मास्क विकत आहेत. सध्याच्या खडतर काळात ही लोकं आपला चरितार्थ सुरु ठेवण्यासाठी काही ना काही कामधंदा करत आहेत हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. माझ्याकडे उपचारासाठी येणाऱ्या काही पेडलर्सनी तर कन्स्ट्रक्शन साईटवरही काम करायला सुरुवात केली आहे.”

आणखी वाचा- गुजरात : तटरक्षक दलाची कारवाई, १ कोटींपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ हस्तगत

यातले अनेक ड्रग पेडलर्स हे या कामातून सुटका व्हावी यासाठी वैद्यकीय मदत घेत आहेत. मार्च महिन्यात मापुसा येथील रुग्णालयात सुमारे २५ ते ३० जणं उपचारासाठी यायची. पण जसंजसं लॉकडाउन वाढत गेलं ही संख्या ६० वर जाऊन पोहचली. अनेकांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. यातल्या काही लोकांनी सध्याच्या काळात छोटी-मोठी कामं करत आपला चरितार्थ चालवत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Goa shortage of drugs forces peddlers to sell vegetables wash cars for a living psd