Goa News: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीका, टोमणे आणि ट्रोलिंगनंतर २२ वर्षांच्या तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कचरा टाकल्याप्रकरणी तरुणाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल झाला होता. जबरदस्त मानसिक धक्का आणि मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
सॅम्युअल गार्विन डी ब्रागांझा (वय २२, रा. गावसावाडो, म्हापसा, गोवा) असे या तरुणाचे नाव आहे. म्हापसा येथे कॉलेजच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल झाला. शिवाय सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. विद्यार्थ्याने बदनामीच्या भीतीने आणि असह्य मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी देशी कट्ट्याने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवले.
व्हिडीओनंतर प्रचंड ट्रोलिंग
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, मृत सॅम्युअलच्या घरात विजेचे काहीतरी काम सुरु होते. म्हापसा पालिकेकडून वेळेवर कचरा गोळा केला जात नसल्याने सॅम्युअलने जमा झालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकला. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आणि तो वाऱ्यासारखा पसरला. म्हापसा पोलिसांनीही या व्हिडीओची तातडीने दखल घेत सॅम्युअलवर गुन्हा दाखल केला. तसेच, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोलिंग देखील केले.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
सोशल मीडियावर सॅम्युअलच्या या व्हिडीओवर प्रचंड ट्रोलिंग झाले. यानंतर एका रात्रीत मानसिकदृष्ट्या कोलमडून गेलेल्या सॅम्युअलने स्वत:वर गोळी झाडली. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली असून, सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे त्यांनी नमूद केले.
