Goa Accident Video: गोव्यात भरधाव थार आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे तर, दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त थार गोव्यात फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती. सोमवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी साडेतीनच्या सुमारास उत्तर गोव्यातील आसगाव हॅप्पीबार जंक्शन येथे हा अपघात झाला. जंक्शनवर भरधाव थारने कारला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.
वृद्धाचा मृत्यू
थारने धडक दिल्याने समोरच्या कारमध्ये असणाऱ्या भगतराम शर्मा (६५, रा. भोपाळ) यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या पत्नी आणि नात या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त थार (जीए ०३ व्ही ५६९५) ही शौर्य गोयल (वय १९, रा. दिल्ली) याने भाड्याने घेतली होती अशी माहिती समोर आली आहे. शौर्य त्याच्या चार मैत्रिणींसोबत म्हापसाकडे जात असताना हा अपघात झाला.
चार महिन्यांची मुलगी बचावली
अपघाग्रस्त दुसरी कार (जीए ०८ एबी ६६८५) तुषार पुनिहाल चालवत होते. तुषार पत्नी, मुलगी, सासू – सासरे यांच्यासह पर्राच्या दिशेने जात होते. दरम्यान, हॅप्पी बार जंक्शन येथे भरधाव थारने कारला जोराची धडक दिली. यात भगतराम शर्मा यांचा मृत्यू झाला तर, चार महिन्यांची लहान मुलगी आणि भगतराम यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. त्यांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घाबरलेल्या शौर्य गोयलचा वडिलांना फोन
अपघात झाल्यानंतर थार चालवत असलेल्या शौर्य गोयलने वडिलांना फोन केला. “पप्पा मी गाडी चालवत होतो. चौकातून दुसरी गाडी आली. आणि पप्पा अचानक अपघात झाला”, असे शौर्य फोनवर बोलत आहे. शौर्य फोनवर बोलत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चालक बदलण्याचा प्रयत्न?
अपघात झाला त्यावेळी एक युवती थार चालवत होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. दरम्यान अपघातानंतर चालकाच्या सीटवर युवक बसला असा दावा स्थानिकांनी केला आहे. हणजूण पोलिसांनी या घटनेची दखल घेत चालक शौर्य गोयल यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

