राज्यातील प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तीला करोनावरील लसीचा कमीतकमी एक डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन पुन्हा सुरू होणार नाहीत, असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या आधी गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनीही पर्यटन व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. “किनारपट्टीवरील संपूर्ण लोकांचे पूर्णपणे लसीकरण केल्यावरच पर्यटन पुन्हा सुरू झाले पाहिजे. गोव्याचे पर्यटन उद्योग आम्ही कायमच बंद ठेवू शकत नाही कारण ते आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कणा आहे,” असे अजगावकर म्हणाले.

गोव्यात करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. लॉकडाउनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसिकांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले.

“जोपर्यंत आम्ही राज्यभर लसीचा पहिला डोस देत नाही तोपर्यंत येथे पर्यटन सुरू होणार नाही. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते उद्दीष्ट साध्य झाल्यावरच आम्ही पर्यटन पुन्हा सुरु करण्याचा विचार करू,” असे सावंत म्हणाले.

पर्यटन मंडळाच्या सूचना

ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा यांनी याबाबत सरकारकडे विचारणा केली होती. त्यानंतर पॉझिटव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा खाली आल्यानंतरच राज्यातील पर्यटन क्षेत्र खुले होईल अशी माहिती देण्यात आली होती. टीटीजीने असा आग्रह धरला आहे की पर्यटन क्षेत्र सर्व सुरक्षा प्रोटोकॉलसह लवकरात लवकर सुरु केले पाहिजे. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच राज्यात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

गोव्यातील करोनास्थिती

सध्या गोव्यात ४०४४ सक्रिय करोना रुग्ण आहेत. तर १,५६,३४५ रुग्ण बरे झाले असून २९६० मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरीकडे, ६,०१,९१२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर त्यापैकी ९९,५४८ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.