गोव्यात दोन रशियन महिलांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही रशियन महिलांची नावे व वय एकसारखेच आहे. तसेच त्यांची हत्या एकाच पद्धतीने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अलेक्सी लिओनोव या रशियन नागरिकाला अटक केली आहे. दरम्यान, लिओनोवने चौकशी दरम्यान मागील आठवड्यात एकूण तीन महिलांची हत्या केल्याचे सांगितले. दोन रशियन महिला व एका भारतीय महिलेची हत्या केल्याचे लिओनोवने सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. तसेच लिओनोव हा २०२३ पासून भारतात आहे. त्यामुळे त्याने यापूर्वीदेखील हत्या केल्या आहेत का ? याचा पोलिस तपास करत आहेत.
गोव्यात काही दिवसांपूर्वी दोन रशियन महिलांची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. एलिना कस्तानोव्हा व एलिना वानिवा अशी हत्या झालेल्या रशियन महिलांची नावे असून दोघींचे वय प्रत्येकी ३७ वर्ष आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी आरोपी अलेक्सी लिओनोव याला अटक केली आहे. तो फायर डिस्प्ले परफॉर्मरचे काम करतो. व्यावसायिक व्हिसावर तो २०२३ मध्ये भारतात आला होता.
लिओनोवने चौकशी दरम्यान मागील आठवड्यात एका आसामी महिलेची हत्या केल्याचे सांगितले आहे. १४ जानेवारी रोजी पोलिसांना एका आसामी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेला अमली पदार्थ देऊन लाकडी काठीने मारहाण करत तिची हत्या केल्याचे लिओनोवने चौकशीत सांगितले. या महिलेचा मृत्यू नेमकं कसा झाला ? याचा पोलिस आता तपास करत आहेत. तसेच लिओनोवने तिची हत्या केली का ? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१४ जानेवारी) रात्री अकरा वाजल्यानंतर लिओनोवने एलिना वानिवाची हत्या केली. मोरजिम गावातील एका भाड्याने घेतलेल्या घरात लिओनोवने धारदार शस्त्राने वानिवाचा गळा चिरला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरूवारी (१५ जानेवारी) लिओनोव्हने एलिना कस्तानोव्हा हिच्यावर देखील हल्ला केला. तिचाही गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. तसेच तिचे हात दोरीने मागे बांधण्यात आले होते. कस्तानोव्हाची हत्या केल्यानंतर लिओनोव फरार झाला होता. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान, एलिना कस्तानोव्हाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना गुरूवारी रात्री मिळाली. त्यानंतर पोलीस एलिना वानिवा हिचा शोध घेत होते. त्यावेळी शुक्रवारी संध्याकाळी वानिवाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. वानिवाची हत्या होऊन ४० तासांहून अधिक कालावधी झाला होता. त्यामुळे तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी दोन्ही महिलांबरोबर रिलेशनशिपमध्ये होता
दोन्ही रशियन महिलांबरोबर रिलेशनशिपमध्ये होतो, असे लिओनोवने पोलिसांना सांगितले. तो त्यांच्याबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दरम्यान, कस्तानोव्हाचे एका दुसऱ्या पुरूषाबरोबर संबंध असल्याचा संशय लिओनोवला होता. त्यामुळे तिची हत्या केली, तसेच वानिवाची हत्या आर्थिक वादातून केल्याचे लिओनोवने पोलिसांना सांगितले.
लिओनोवने आणखी काही महिलांच्या हत्या केल्या का ?
“लिओनोव सारखे जबाब बदलत आहे. चौकशी दरम्यान एकदा त्याने आणखी महिलांचीदेखील हत्या केल्याचे सांगितले. परंतु, त्याबाबत ठोस काही सांगितले नाही.”, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. लिओनोव हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन्ही रशियन महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन अद्याप झालेले नाही. रशियन दूतावासाकडून परवानगी आल्यानंतर शवविच्छेदन पार पडेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
