गोव्याला श्रीमंत पर्यटक हवे आहेत, ड्रग्ज घेऊन गोंधळ घालणारे किंवा बसमध्ये बसवून जेवण बनवणारे नको, असं वक्तव्य गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी केलंय. “आम्हाला ड्रग्ज घेणारे पर्यटक नको आहेत. आम्हाला गोव्याची नासधूस करणारे पर्यटक नको आहेत. आम्हाला गोव्यातील बसमध्ये अन्न शिजवणारे पर्यटक नको आहेत. आम्हाला गोव्यात सर्वात श्रीमंत पर्यटक हवेत. आम्हाला आमच्या संस्कृती, वारसा आणि गोव्याचा आदर करणारे पर्यटक हवेत. आम्ही सर्वच पर्यटकांचे राज्यात स्वागत करतो, परंतु त्यांनी संस्कृती आणि परंपरेच्या मर्यादा जपून गोव्याचा आनंद घ्यावा,” असे आजगावकर म्हणाले. ते राज्य विधानसभेच्या चालू असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.

अलिकडे गोव्यात बसने पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहेत. हे पर्यटक पर्यटन क्षेत्रात रस्त्यांवर अन्न शिजवतात आणि खातात. त्यामुळे राज्य सरकारने अलीकडेच सार्वजनिक ठिकाणी स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे. गोव्याच्या रस्त्यांवर जेवण बनवणं हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तसेच ड्रग्जचे सेवन करून राज्यात गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांना सहन केलं जाणार नाही, असं मंत्री आजगावकर यांनी सांगितलं. “आम्ही ड्रग्जच्या विरोधात आहोत. आमचे सरकार याच्या विरोधात आहे, आमचे मुख्यमंत्री याच्या विरोधात आहेत, मी त्याच्या विरोधात आहे,” असे पर्यटन मंत्री म्हणाले.

“आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पाच लाख मोफत व्हिसा देण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयामुळे गोव्याला फायदा होईल. राज्यातील पर्यटन आता खुले होणार आहे. पंतप्रधानांनी पाच लाख मोफत व्हिसाची घोषणा केली आहे. येत्या काळात चार्टर फ्लाईट्स सुरू होतील. आम्ही आधीच शॅक आणि हॉटेल परवान्यांशी संबंधित ५० टक्के शुल्क माफ केले आहे,” असेही आजगावकर म्हणाले.