scorecardresearch

Railway Bonus: दसऱ्याआधीच रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार; ११ लाख कर्मचारी ठरणार ‘लाभार्थी’

सलग १२ व्या वर्षी बोनस देण्याच्या या निर्णयामुळे भारतीय रेल्वेवर दोन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.   

Railway Bonus: दसऱ्याआधीच रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार; ११ लाख कर्मचारी ठरणार ‘लाभार्थी’
केंद्रीय मंत्रीमंडळ आज निर्णय घेण्याची शक्यता

दसऱ्याच्या आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी येणार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना सन २०२१-२२ सालासाठी देण्यात येणारा प्रोडक्शन लिक्ड बोनस म्हणजेच पीएलबी देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ११ लाख कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारावर देण्यात येणारा हा बोनस मिळणार आहे. विशेष म्हणजे हा बोनस ७८ दिवसांचा पगाराइतका असणार आहे. म्हणजेच रेल्वे कर्मचाऱ्यांना जवळजवळ तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतीय रेल्वेवर दोन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

नक्की वाचा >> नवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले

यापूर्वी २०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने अशाप्रकाराचा ७८ दिवसांचा बोनस रेल्वेच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिला होता. याचा फायदा ११ लाख ५६ हजार नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना होणार असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. अधिकारी पदावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नॉन गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. क्लास वन, क्लास टू स्तरावरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. दरवर्षी हा बोनस दसरा आणि दुर्गापुजेच्या कालावधीमध्येच जाहीर केला जातो.

महिन्याला सात हजार रुपये पगार असणारे नॉन गॅझेटेड कर्मचारी या बोनससाठी पात्र असतील. ७८ दिवसांचा बोनस म्हणून जास्तीत जास्त १७ हजार ९५१ रुपये दिले जाणार असल्याचं पात्रतेच्या निकषांबद्दल स्पष्ट करताना सांगण्यात आलं आहे. आरपीएफ आणि आरपीएसएफ म्हणजेच रेल्वे पोलीस आणि राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना वगळून या निकषांमध्ये बसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार आहे. मागील १२ वर्षांपासून सातत्याने हा बोनस दिला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या