भारत-अमेरिका यांच्या सुधारलेल्या संबंधांची चीनने धास्ती घेण्याची गरज नाही – ओबामा

भारत-अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधांमुळे चीनने धास्ती घेण्याचे कारण नाही परंतु व्हिएतनाम व फिलिपिन्स यांसारख्या लहान देशांच्या सागरी प्रश्नांच्या

भारत-अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधांमुळे चीनने धास्ती घेण्याचे कारण नाही परंतु व्हिएतनाम व फिलिपिन्स यांसारख्या लहान देशांच्या सागरी प्रश्नांच्या संदर्भात खोडय़ा काढण्याचे चीनने थांबवावे असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
चीनच्या विधानांनी आपण आश्चर्यचकित झालो. चीनने भारताशी आमचे संबंध सुधारत असल्याने धास्ती घेण्याचे कारण नाही, असे ओबामा यांनी त्यांच्या भारत भेटीवर चीनने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर म्हटले आहे.
ओबामा यांनी नोव्हेंबरमधील चीन भेटीचा संदर्भही दिला व सांगितले की, आपण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी यशस्वी चर्चा केली होती.
चीनला शह देण्यासाठी अमेरिकेला पाठिंबा देण्याच्या पाश्चिमात्य देशांच्या सापळ्यात भारताने पडू नये व आशियात अमेरिकेचे महत्त्व वाढवू नये, असे चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.
सर्वच देशांनी लोकांची भरभराट करण्याचा उद्देश ठेवला पाहिजे व एकोप्याने काम केले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपली चर्चा त्याच उद्देशाने झाली, असे त्यांनी ‘सीएनएन’चे पत्रकार फरीद झकेरिया यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
चीनचा शांततामय उदय हा अमेरिकेच्या फायद्याचाच आहे असे सांगून ते म्हणाले, की चीनचे विघटन आम्हाला नको आहे. चीनने प्रगती करणे आमच्या हिताचेच आहे पण त्यांनी त्यांची आर्थिक वाढ इतर लोकांच्या किंवा देशांच्या जीवावर करू नये.
व्हिएतनाम व फिलिपिन्स सारख्या देशांच्या खोडय़ा काढू नये, त्यांच्याबरोबरचे प्रश्न शांततेने व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मिटवावेत. त्यांनी त्यांच्या चलनात हवे तसे बदल करून व्यापारी फायदे घेऊ नयेत, असे आवाहन करून ओबामा यांनी काही वेळा चीनने आमच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला आहे, काही वेळा दिला नाही, याकडे लक्ष वेधले. चीनची आपल्याला काळजी आहे, त्यांच्याशी सकारात्मक संबंध आम्हाला हवे आहेत. असेही ओबामा म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Good us india relations no threat to china says obama