Sam Altman AI Coding latest update on the future of software developers: एकेकाळी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी डेव्हलपरला तासनतास बसून कोडिंग करावे लागत असे. कोडिंगची प्रत्येक ओळ बारकाईने लिहावी लागत असे. त्यातील मुद्दे एक एक करून सोडवावे लागत असे. डेव्हलपर्सच्या मेहनतीमुळेच आजचे डिजिटल जग दिसत आहे. आता एआय सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची जागा घेणार आहे, असे म्हटले जाते. मानवी कोडर्स इतिहासजमा होणार का? अशी चर्चा असतानाच आता ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे.

सॅम ऑल्टमन यांनी एक्सवर शेअर केलेल्या ताज्या पोस्टमध्ये लिहिले, “ज्या लोकांनी अत्यंत गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरचे कोडिंग केले, त्या लोकांबद्दल मला खूप कृतज्ञता वाटते. यासाठी या लोकांनी खरोखरच खूप मेहनत घेतली. याची आठवण आली तरी ते किती कठीण होते, याची जाणीव होते. मला या सर्वांचे आभार व्यक्त करायचे आहेत.”

एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेद्वारे आता काही सेकंदात सॉफ्टवेअरचा कोड लिहिला जाऊ शकतो. अशावेळी ऑल्टमन यांचा हा संदेश समोर आला आहे. एआय आता कोडमधील चुका दुरूस्त करू शकतात आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामची रचना करण्याचे उत्तम पर्यायही सुचवू शकतात. पूर्वी अनेक डेव्हलपर्सना जे काम करायला बरेच तास लागायचे, ती कामे आता वेगाने होत आहेत. यामुळे साहजिकच कोडिंगच्या नोकऱ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मानवी कोडर्सची नोकरी जाणार का? असा प्रश्न एका युजरने या पोस्टखाली विचारला होता. तसेच इलॉन मस्क यांच्या ग्रोक या चॅटबॉटला टॅग करून त्याचे उत्तर मागितले होते. ग्रोकने याबद्दल एक चांगले उत्तर दिले. ग्रोकने लिहिले, “नाही, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग संपणार नाही. तर ती वेगाने विकसित होत आहे. एआयद्वारे नियमित प्रकारातील कोडिंग स्वयंचलित होईल. ज्यामुळे उत्पादकता वाढेल. परंतु आर्किटेक्चर, मोठ्या प्रणालीतील त्रुटी दूर करणे. कामातील नैतिकता आणि खरीखुरी नाविन्यता यासाठी मानवी हस्तक्षेप अपरिहार्य असेल.”

अनेक युजर्सनी सॅम ऑल्टमन यांच्या पोस्टखाली विरोधातील प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “तुमचे स्वागत आहे. आमच्या नोकऱ्या काढून घेणे, हेच आमचे बक्षीस आहे, हे जाणून आनंद वाटला.”