Google Release 3 Crore Mosquitoes: जगभरात डेंग्यू, झिका आणि चिकुनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी आता टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘गुगल’ने एक अनोखी मोहीम आखली आहे. गुगल अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा राज्यांमध्ये तब्बल ३ कोटी २० लाख डास सोडण्याच्या तयारीत आहे. वाचायला जरी हे विचित्र वाटत असले, तरी हा गुगलच्या एका मोठ्या आरोग्य प्रकल्पाचा भाग आहे.
‘डिबग’ मोहीम काय आहे?
गुगलची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’च्या (Alphabet) लाईफ सायन्सेस विभागाने डासांच्या नियंत्रणासाठी ‘डिबग’ (Debug) हा विशेष प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत ‘एडिस इजिप्ती’ (Aedes aegypti) या डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरस पसरवणाऱ्या डासांच्या प्रजातीला लक्ष्य केले जात आहे. यामध्ये प्रगत जैवतंत्रज्ञान (Biotechnology), डेटा अॅनॅलिटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो नद्या (पुरुष) डासांची पैदास केली जाते.
…म्हणून हे डास माणसांना चावणार नाहीत!
वैज्ञानिक संशोधनानुसार, माणसांना फक्त मादी डास चावतात, नर डास नाही. गुगल याच विज्ञानाचा वापर करणार आहे.
- या मोहिमेत सर्व नर डासांना ‘वोल्बाकिया’ (Wolbachia) नावाच्या नैसर्गिक जीवाणूने (Bacteria) संक्रमित केले जाते.
- हे संक्रमित नर डास जेव्हा जंगलात किंवा निवासी भागात सोडले जातील, तेव्हा तेथील मादी डासांसोबत त्यांचा प्रजनन प्रक्रिया होईल.
- ‘वोल्बाकिया’ जीवाणूमुळे या डासांपासून पुढील पिढी म्हणजेच अंडी तयार होऊ शकत नाहीत.
- परिणामी, पुढील काही पिढ्यांमध्ये डासांची संख्या नैसर्गिकरित्या झपाट्याने कमी होते. हे डास नर असल्याने ते मानवाला चावत नाहीत आणि कोणताही आजार ही पसरवत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यापासून कोणताही धोका नसतो.
अमेरिकेकडे परवानगीची मागणी; ५ जूनपर्यंत जनतेचे मत मागवले
अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेकडे (EPA) गुगलच्या ‘डिबग’ प्रकल्पाने वार्षिक १६ दशलक्ष (१ कोटी ६० लाख) याप्रमाणे दोन वर्षांसाठी एकूण ३ कोटी २० लाख डास सोडण्याची परवानगी मागितली आहे. ‘फेडरल रजिस्टर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या नोटीसूनुसार, सध्या या प्रस्तावावर पुनरावलोकन सुरू असून, ५ जूनपर्यंत यावर जनतेची मते आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
रासायनिक फवारणीला उत्तम पर्याय
गुगलच्या मते, सध्या डास नियंत्रणासाठी वापरली जाणारी कीटकनाशकांची फवारणी पर्यावरणपूरक नाही आणि काळासोबत डासांवर या औषधांचा प्रभावही कमी होत चालला आहे. याउलट, गुगलचे हे तंत्रज्ञान अत्यंत अचूक आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवणारे आहे.
सिंगापूरमध्ये ‘गुगल’चा प्रयोग यशस्वी!
हा प्रयोग पूर्णपणे नवा नाही. याआधी गुगलने सिंगापूर सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला असून तिथे याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
| क्षेत्र/निकष | प्रकल्पाचे यश (सिंगापूर) |
|---|---|
| डासांच्या संख्येत घट | ८०% ते ९०% |
| डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट | ७०% पेक्षा जास्त |
या यशानंतर ‘डिबग’ प्रकल्पाचे प्रमुख लिनस अप्सन यांनी सांगितले की, “सिंगापूरमधील यशामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. जगातील डेंग्यूचा ७०% भार हा आशियाई देशांवर आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या जोरावर ही मोहीम आता आशियासह जगातील इतर भागांमध्ये विस्तारण्याचा आमचा मानस आहे.”
