गूगल डूडलने बुधवारी प्रख्यात भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडुपी रामचंद्र राव यांचा ८९ वा वाढदिवस साजरा केला, ज्यांना लोक “भारताचे सॅटेलाईट मॅन” म्हणून ओळखतात.

डूडलमध्ये उजव्या हातात उपग्रह घेतलेले प्रोफेसर राव यांचे रेखाटन आहे आणि त्यांच्यामागे अंतराळ आणि पृथ्वीचे चित्र आहे. “आपली ताऱ्यांच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजुनसुध्दा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे,” असं गुगलने त्यांच्या वर्णनात लिहिलं आहे.

भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष असलेले राव यांनी १९७५ साली “आर्यभट्ट” या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते.

“१० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील एका दुर्गम गावात प्रा. राव यांचा जन्म झाला. त्यांनी वैश्विक किरणशास्त्रज्ञ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर प्रो. राव अमेरिकेत गेले, जिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आणि नासाच्या पायोनियर आणि एक्सप्लोरर स्पेस प्रोब या प्रकल्पांवर देखील काम केले, ” असे गुगल डूडलच्या संकेतस्थळावरील वर्णनात लिहिले आहे.

१९६६ मध्ये भारतात परत आल्यावर प्रा. राव यांनी भौतिक विज्ञान संशोधन प्रयोगशाळेत, एक व्यापक उच्च उर्जा खगोलशास्त्र कार्यक्रम सुरू केला. १९८४ ते १९९४ पर्यंत प्रो. राव यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

२०१३ मध्ये राव सॅटेलाईट हॉल ऑफ फेममध्ये सामील झाले, त्याच वर्षी पीएसएलव्हीने मंगळाभोवती परिक्रमा करणाऱ्या ‘मंगलयान’ या भारताच्या पहिल्या आंतरखगोलिय प्रकल्पाची सुरूवात केली. २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले.

‘हे’ आहेत गुगलने डुडलमधून मानवंदना दिलेले भारतीय